Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Satara › ‘कोयने’च्या पाणीसाठ्याबाबत समाधान आणि चिंताही 

‘कोयने’च्या पाणीसाठ्याबाबत समाधान आणि चिंताही 

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:26AMपाटण  : गणेशचंद्र पिसाळ

चालू तांत्रिक वर्षात कोयना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही समाधानाची बाब असली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीजनिर्मितीसाठी 18.34 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने तब्बल 695.253 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी करण्यात आली आहे. यामुळे राज्याचा अब्जावधींचा महसूल पाण्यात गेला आहे. आगामी काळात या पाण्याचा सकारात्मक वापर झाला नाही, तर महसूल तर बुडणारच आहे. याशिवाय जूनपासून सुरू होणार्‍या नव्या तांत्रिक वर्षात महापुराचे हेच पाणी आमंत्रण ठरू शकते, याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या धरणात आता नऊ तांत्रिक महिने संपल्यावरही तब्बल 76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. फेब्रुवारीअखेर धरणातील एकूण पाण्यापैकी     पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 36.23, पूर्वेकडील सिंचनासाठी 15.14 व पूरकाळात 2.48 अशा एकूण 53.85 टीएमसी पाण्यावर एकूण 1758.916 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. 

याच काळात गतवर्षी पश्‍चिमेकडे 51.14, पूर्वेकडे सिंचनासाठी 16.84, पूरकाळात 4.21 अशा एकूण 72.19 टीएमसी पाण्यावर 2454.169 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी 18.34 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने तब्बल 695.253 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी करण्यात आली आहे. 

चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठीच्या 67.50 टीएमसी आरक्षित पाण्यापैकी केवळ 36.23 टीएमसीच तर सिंचनासाठी 15.14 टीएमसी पाणीवापर झाला आहे. त्यामुळे धरणात तब्बल 76.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून यापैकी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीचा आरक्षित 31.27 टीएमसी पाणीकोठा शिल्लक आहे. या तीन महिन्यात याचा पुरेपूर वापर झाला तर ज्यादा वीजनिर्मिती होवून राज्याच्या महसुली उत्पन्नात भर पडणार आहे. मात्र पाणीवापर त्या प्रमाणात झाला नाही तर हा पाणीसाठा शिल्लक राहून जूननंतर पडणार्‍या पावसामुळे धरण लवकर भरल्याने मग हे पाणी पूर्वेकडे विनावापर सोडून द्यावे लागणार आहे.  त्यामुळे महापुराचा धोका आहेच.