Wed, Feb 26, 2020 20:52होमपेज › Satara › माण होरपळला; पाणी विकत घेण्याची वेळ

माण होरपळला; पाणी विकत घेण्याची वेळ

Published On: Dec 13 2018 1:43AM | Last Updated: Dec 12 2018 7:56PM
दहिवडी : राजेश इनामदार

माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दहिवडी बिदाल, गोंदवले या मोठ्या गावांची तहान भागवणारा आंधळी तलाव पूर्णतः कोरडा ठणठणीत पडला आहे.राजवडी, दहिवडी परिसरात लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दहिवडीचा टँकर प्रस्ताव अजूनही तहसील कार्यालयातच असल्याने येथील जनता त्रस्त झाली आहे.

पाण्यावाचून जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. माण तालुक्यातील गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलने देखील तळ गाठला आहे. उरमोडीचे पाणी तातडीने पिंगळी तलावात जास्तीत जास्त साठवणे गरजेचे असताना  त्या पाण्यासाठी फक्त श्रेयवादच चालू आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. हळूहळू संपूर्ण तालुका टँकरग्रस्त होऊ लागला आहे. तालुक्यातील 105 महसुली गावांपैकी 29 गावांना व 185 वाड्या-वस्त्यांना टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु आहे.  सध्या  26 खेपा मंजूर आहेत तर त्यामध्ये शासनाच्या 7 व खाजगी 19 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये जवळपास दहा हजार पशुधन तर 44 हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. माण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा शाखेकडे टँकर मागणीचे प्रस्ताव अजूनही वाढत आहेत.

तालुक्यातील पाच ठिकाणी टँकर भरले जात आहेत. यामध्ये ढाकणी तलाव, लोधवडे नळ पाणी पुरवठा योजना, पिंगळी, शिंदी येथील खाजगी विहीर अधिग्रहण करण्यात आली असून या फीडिंग पॉईंटवरून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. 

आंधळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा अनेक गावांना पुरवठा केला जात होता. मात्र, यावेळी या ठिकाणाहून दहिवडी व गोंदवले, बिदाल या  गावाला पाणी पुरवठा होत आहे. तो देखील तोकडा पडू लागल्याने दहिवडी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे.

दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी मोठा आठवडी बाजार भरतो. सर्वच शासकीय कार्यालये येथे असल्याने लोकांची नेहमीच वर्दळ असते. दोन महाविद्यालये व माध्यमिक शाळेचेच विद्यार्थी 10 हजाराच्या आसपास आहेत. बाहेरगावातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात 20 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यामुळे या सर्वांना पाणी पुरवठा करणे जिकीरीचे बनले आहे. ग्रामस्थांना दिवसभर पाण्यासाठी वणवण करत हिंडावे लागत आहे. पाणी नसल्याने दहीवडीवासीय त्रस्त झाले आहेत. 

पिंगळी तलावात पाणी आल्याचा गाजावाजा मोठ्या जल्लोषात करण्यात आला. मात्र, अजून देखील पाणी पिंगळी तलावात सोडले गेले नसल्याने नगरपंचायत पाणी पुरवठा योजना बंदच आहे. तहानलेल्या दहिवडीकरांना अजून पंधरा ते वीस दिवस याची वाट पहावी लागणार आहे. यात वाड्या-वस्त्यांवर अजून टँकर सुरु करणे गरजेचे आहे. दहिवडी तहसीलदार कार्यालयात टँकरचा प्रस्ताव पडून असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

माण तालुक्याच्या पूर्वभागाकडे उरमोडीचे पाणी फिरल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची तीव्रता नाही. मात्र लाभ क्षेत्र वगळता अनेक गावात चारा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तसेच डाळींब बागा करपून गेल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर गंभीर परस्थिती उदभवू शकते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

अन्यथा आंदोलन करू...

पिंगळी तलावात पाणी सोडावे, असे आदेश राज्य शासनाने दिले असताना पिंगळी तलावात प्रत्यक्ष पाणी पोहचत नाही. मध्येच पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. टंचाईमधून पाणी सोडले असताना बंधारे भरताना लोकांना वीज बिलाचे पैसे भरावयाचे आहेत, असे सांगून काही जण पैसे उकळताना दिसत आहेत. पिंगळी तलावात पाणी सोडायचे आदेश असताना पूर्ण क्षमतेने तलावातच पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माण पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव तसेच या परिसरातील दुष्काळी जनतेने दिला आहे.