Sun, May 26, 2019 01:17होमपेज › Satara › कराड दक्षिण भागात चार दिवसातून एकदा पाणी

कराड दक्षिण भागात चार दिवसातून एकदा पाणी

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 9:01PMकराड : अशोक मोहने 

कराड तालुक्यात यावर्षी महसूल प्रशासनाने 29 गावे टंचाईग्रस्त घोषित केली आहेत. मात्र 50 गावे  व 26 वाड्या पाणी टंचाईच्या झळा सोसत आहेत. ओंडोशी, मनव, पवारवाडी, नांदगाव आदी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून सार्वजनिक नळांना चार दिवसातून एकदा पाणी येत आहे. अन्य गावात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे कराड तालुक्यात आज अखेर टंचाई निवारणाचे एकही काम सुरू नाही. शिवाय टंचाई आढावा बैठकांचाही दुष्काळच पहायला मिळत  आहे. 

यावर्षी कराड तालुक्यातील 29 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये अंतवडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, घोगाव, घोलपवाडी, हरपळवाडी, मनू, नांदगाव, ओंडोशी, पवारवाडी (नांदगाव), रिसवड, सयापूर, बामणवाडी, बाबरमाची (डिचोरी), भुरभुशी, धोंडेवाडी, गायकवाडवाडी, करंजोशी, कालेटेक, म्हसोली, नांदलापूर, निगडी, ओंड, शेळकेवाडी (म्हसोली), वनवासमाची (खोडशी), वानरवाडी, महारूगडेवाडी, अकाईचीवाडी, सावरघर या गावांचा समावेश आहे. वास्तविक याहून अधिक गावात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मार्च ते 30 जून अखेर 50 गावे व 26 वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. टंचाईवर मात करण्यासाठी या गावांसाठी काही उपययोजना सुचविल्या आहेत. 

यामध्ये प्रामुख्याने विहीर खोलीकरण करणे 18 ठिकाणी, खासगी उद्भव अधीगृहण करणे 17 ठिकाणी, जुन्या हातपंपांच्या पाईप वाढविणे 30, नवीन विंधन विहिरी घेणे 14, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती 3 ठिकाणी आदी कामांचा समावेश आहे. 

शेळकेवाडी (म्हसोली), भुरभुशी व अकाईचीवाडी या ठिकाणी नळ योजनांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव आहे.  66. 56 लाख रूपयांचा प्रस्ताव या विभागाने जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. मात्र अद्याप टंचाई निवारणासाठी एक दमडाही शासन स्तरावरून उपलब्ध झालेला नाही. टंचाई आढावा बैठकाही घेण्यात आलेल्या नाहीत. यावरून टंचाईच्या प्रश्‍नावर प्रशासन किती उदासीन आहे हेच दिसून येत आहे. 
मसूरपूर्व व दक्षिणमधील अनेक गावांना सध्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. दक्षिणमधील ओंडोशी, मनव, नांदगाव, ओंड आदी गावात ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विहिरींसह पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने सार्वजनिक नळांना चार दिवसातून एकदा पाणी येत आहे. महिला, मुलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. 

तालुक्यातील ६१ पैकी तब्बल ४१ पाझर तलाव पडले कोरडे 

मार्च ते मे दरम्यान शेतीसाठी मोठा आधार ठरणारे पाझर तलाव पूर्ण आटले असून लघु पाटबंधारे विभागाच्या 61 तलावापैकी 41 तलाव पूर्ण कोरडे पडले आहेत. उर्वरीत 20 तलावात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक असून एप्रिल अखेर हे तलावही आटणार आहेत. त्यामुळे तलावावर अवलंबून असणार्‍या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

लघुपाटबंधारे विभागाचे अंतवडी, नांदगाव, सदाशिवगड, गमेवाडी, तुळसन, सुर्ली, टाळगाव, चचेगाव, चोरे, किवळ कासारडोह हे मोठे पाझर तलाव आहेत. सध्या हे सर्व तलाव आटले आहेत. मसूरमध्ये निगडी भागात ओढ्यांना पाणी आहे.  जलयुक्ती शिवारमधून तेथे झालेल्या कामांचा हा चांगला परिणाम दिसून येत आहे. मात्र ही कामे मर्यादित झाल्याने एप्रिल नंतर या भागाला टंचाईचा सामना करावा लागणार आहे. घोलपवाडी, मेरवेवाडी, खोडजाईवाडी आदी ठिकाणीही जलयुक्तमधून  कामे झाली आहेत. मात्र यावर्षी याचा अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. 

पाझर तलावातील पाणीसाठा आटल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे सध्या शेतात असलेली पिके सुकू लागली असून शेतकरी चिंतातूर बनला आहे. सध्या एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची तीव्रता जाणवू लागल्याने मे महिन्यामध्ये तर पाण्याची तीव्रता अधिकच जाणवणार आहे. 

 

Tags : satara, Karad news, Water, Water problem,