Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Satara › दुष्काळ हटवण्यासाठी कटगुणकर एकवटले 

दुष्काळ हटवण्यासाठी कटगुणकर एकवटले 

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:32PMखटाव : प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले यांची कुलभूमी असलेल्या कटगुणमध्ये जलसंधारणाच्या कामाचे तुफान शनिवारी मध्यरात्री सुरू झाले आहे. दुष्काळ  कायमचाच हद्दपार करण्यासाठी हातात टिकाव आणि खोरं घेत ढोल ताशाच्या गजरात सुमारे 1600 पुरुष, महिला आणि बाळगोपाळ  मध्यरात्री गोसाव्याच्या माळावर बेभान होवून कामाला लागले. चक्क मशालींच्या उजेडात  जलसंधारणाच्या कामांचा श्रीगणेशा करण्यात आला. 

नेमीची येतो दुष्काळ ’ अशी कटगुणची  परस्थिती आहे. गेल्या वर्षी तर 15 दिवसातून एकदा नळाला पाणी यायचे. नोव्हेंबर, डिसेंबर पासूनच गावातील बायकापोरांना आणि वृध्दांनाही  पाण्यासाठी दाही दिशेला वणवण करावी लागायची. आजपर्यंत अनेक पिढ्यांचा दुष्काळी टाहो सरकार दरबारी पोहचूनही पदरी काहीच पडले नाही.म्हणूनच ज्या कटगुणच्या महात्मा फुलेंनी  एके काळी शिक्षण, शेती आणि पाणी यावर समाजप्रबोधन करून सार्‍या  देशात तुफान उभे केले होते, त्या कटगुणकरांनी दुष्काळ स्वतःच्या हिमतीवर हटवायचा निर्धार केला आहे. 

जाखणगाव, भोसरे या  गावांनी पाण्याच्या बाबतीत केलेली क्रांती पाहून आपल्याही गावात हे वादळ आणायचा मनाशी चंग त्यांनी बांधला आहे. आता पाणी डोळ्यात नाही तर गावात पाहुया, हीच वेळ आहे आपलं गाव पाणीदार करण्याची,अशा  घोषणा देत  संपूर्ण गाव कामाला लागले.

विविध पातळ्यांवर ग्रामसभा घेण्यात आल्या. सर्व राजकीय पक्ष पाण्यासाठी  एक झाले. गावातील नारीशक्तीने या कामात झोकून देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी  जलसंधारणाची  कामे हाती घ्यायचीच हा निर्धार पक्का झाला. समस्त कटगुणकरांनी जाखणगावला भेट देऊन तेथील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. 

कामाच्या दिवशी जलदिंडी आणि शस्त्रांचे पूजन करण्यात आले. कटगुणकरांची पाण्यासाठी चाललेली धडपड पाहून त्यादिवशी धावडदरे, शिंदेवाडी आणि आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांमधून ग्रामस्थ उपस्थित राहिले. पहिल्या दिवशी 500 मीटर  सीसीटी, शेततळे आणि एका माती बंधार्‍याचे काम पूर्ण करण्यात आले. 

 

Tags : satara, Katgun news, Water conservation, work,