होमपेज › Satara › जिहे कठापूरला जल आयोगाची मान्यता

जिहे कठापूरला जल आयोगाची मान्यता

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:26PMखटाव : प्रतिनिधी

पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचा सामना करणार्‍या खटाव व माण तालुक्यांतील शेतकरीवर्गासह सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी सुवर्णकांचन योग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू व सहकार भारतीचे संस्थापक कै. लक्ष्मणराव इनामदार (खटाव)लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेल्या व खटाव माण तालुक्यांसाठी नंदनवन ठरणार्‍या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेस केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे.  याच्या आनंदाप्रीत्यर्थ पुसेगाव, ता. खटाव येथील छ. शिवाजी चौकात फटाके वाजवून  तसेच जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा मोठ्या जल्लोषात करण्यात आला.

सन 1997साली युती शासनाच्या काळात खटाव -माण या कायम दुष्काळी व अवर्षण प्रवण तालुक्याचा शेती पाणी प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेस 269 कोटी रूपयेची मंजूरी दिली होती.मात्र त्यानंतरच्या आघाडी शासनाने या योजनेकडे जाणिपूर्वक दुर्लक्ष करून या भागातील लोकांना व शेतकर्‍यांना गेली 20 वर्ष झुलवत ठेवले. खटाव येथील कै.लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून महेश शिंदे, विनोद इनामदार,सुहास शिंदे व ट्रस्टचे पदाधिकारी यांनी वांरवांर या योजनेच्या पूर्णत्वासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यावेळी या योजनेचा खर्च 269 कोटी रूपयांवरून 1085 कोटी रूपयांवर पोहचला होता. हा प्रकल्प  अनुशेषातून बाहेर काढणे व त्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामात विशेष लक्ष घातल्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दि. 6 नोव्हेंबर 2017 ला या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली होती.परंतू यासाठी निधीची आवश्यकता होती त्यासाठी भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे व केंदईय जलसंपदामंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे या ट्रस्टने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

पंतप्रधान कार्यालयात निधीसाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री,पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी,जलसंपदा सचिव रा.वा.पानसे व पंतप्रधान कार्यालय संचालक डॉ धीकर परदेशी यांची सविस्तर चर्चा होऊन खटाव-माण या तालुक्यांसाठी संजीवनी ठरणार्‍या या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेस 800 कोटी रूपयांची तातडीने मंजूरी मिळाली होती. आज सायंकाळी या तालुक्याचे नंदनवन करणार्‍या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाल्याचे वृत्त समजताच युवा नेते महेश शिंदे,जनशकती संघटनेचे नेते व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त रणधीर जाधव, पुसेगावचे सरपंच सौ दिपाली मुळे, उपसरपंच प्रकाश जाधव, पंचायत समिती सदस्या सौ नीलादेवी जाधव, भरत मुळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव,अ‍ॅड श्रीनिवास मुळे यांंच्यासह भागातील विविध गावांचे सरपंच,उपसरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला : महेश शिंदे 

खटाव व माण या पिढ्यान्पिढ्या दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्यांतील तहानलेल्या जनतेला 40 वर्षांत आघाडी शासनाने पाण्याचे गाजर दाखवून मतांचे राजकारण करत सत्ता उपभोगली. केवळ पाण्याचे टँकर व चारा छावण्या चालवण्यातच धन्यता मानली. पाणी मागणार्‍या जनतेची क्रूर चेष्टा केली. मात्र, सध्या सत्तेत असलेल्या भाजप शासनाने दुष्काळी भागातील लोकांचे दु:ख जाणले. या योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाच पण केंद्रीय जलआयोगाची मान्यताही दिल्याने या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या बांधाबांधावर आता पाणी खेळणारच यात तीळमात्र शंका उरली नाही. दिल्ली येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये झालेल्या बैठकांमध्ये जिहे-कठापूर योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय झाला होता.  केंद्रीय जल आयोगाच्या दिल्‍ली येथील बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, शेखर चरेगावकर, विक्रम पावस्कर, संजयकाका पाटील, लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण ट्रस्टचे पदाधिकारी व भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांमुळे ही योजना पूर्णत्वास जाईल. ही योजना आमच्यासाठी जीवनदायिनी असून विरोधकांनी खोटे राजकारण आणू नये.  गेली 65वर्षे आमच्या कित्येक पिढ्या दुष्काळाने होरपळल्या होत्या. या गोष्टीचा विरोधकांनी विचार करावा व आम्हाला ही योजना पूर्ण करण्यास मदत करावी, असे आवाहन युवा नेते महेश शिंदे यांनी केले आहे.