Mon, Mar 25, 2019 09:49होमपेज › Satara › कराड : वाळू चोरीवर ग्राम दक्षता समित्यांचा ‘वॉच’

कराड : वाळू चोरीवर ग्राम दक्षता समित्यांचा ‘वॉच’

Published On: Jan 06 2018 6:58PM | Last Updated: Jan 06 2018 6:58PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने वाळू /रेती निर्गती सुधारीत धोरण जारी केले आहे. त्यानुसार विविध स्तरावरुन दक्षता समित्या स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करीत कराड तालुक्यातील येरवळे आणि चचेगाव या गावांची दक्षता समिती स्थापन करण्यात आली. वाळू उत्खनन होवू शकणाऱ्या सर्व गावांमध्ये अशी समिती स्थापन होवून प्रभावी कामकाज करेल, अशी माहिती कराडचे तहसिलदार राजेंद्र शेळके यांनी दिली.

राज्य सरकारकडून दि. 3 जानेवारीला याबाबतचे आदेश पारीत केल्यानंतर दोनच दिवसात येरवळे ता. कराड येथे प्रत्यक्ष जावून तहसिलदारांनी तेथील ग्राम दक्षता समिती स्थापन केली. या समितीची पहिली बैठकही पार पडली. ग्रामपंचायतीचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल हे समितीचे सदस्य तर गावचे तलाठी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तहसिलदार शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

गठीत करण्यात आलेल्या दक्षता समितीने गावच्या कार्यक्षेत्रात वाळू/रेतीचे उत्खनन होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणी उत्खनन करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई प्रस्तापीत करुन तहसिल कार्यालयाकडे अवगत करण्यास सांगण्यात आले आहे. या समितीची दर 15 दिवसाला आढावा बैठक घेवून झालेल्या कामकाजाचा अहवालही देण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान ग्रामसमिती प्रमाणेच जिल्हा, विभागीय आणि तालूका स्तरावरही अशाच प्रकारच्या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्यानुसार तालूकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तर सदस्य म्हणून उपअधिक्षक भूमि अभिलेख,गट विकास अधिकारी व पोलिस निरीक्षक आणि सदस्य सचिव म्हणून महसूल नायब तहसिलदार काम पाहणार असल्याचेही तहसिलदार शेळके यांनी सांगितले.

या समितीमुळे शासनाचे सर्व विभाग बोकायदा वाळू/रेती उत्खनन विरोधी शासनाच्या कारवाईत महसूल विभागाला सक्रीय साथ करतील यातून धडक कारवाई करता येणे शक्य होईल. तसेच बेकायदा वाळू उत्खननास प्रतिबंध करणे सोपे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.