Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Satara › दिवसभर आमचा दुर्गंधीशी सामना

दिवसभर आमचा दुर्गंधीशी सामना

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 8:58PMकराड : प्रतिभा राजे

नाकाला झोंबणारी प्रचंड दुगर्र्ंधी, कुजलेला, नासलेला कचरा, खराब झालेले अन्नाचे तुकडे, कधी मेलेले उंदीर, घुशी, मांसाचे तुकडे यातच हात घालून कचर्‍याचे विलगीकरण करण्याचे काम कचरा वेचक महिला करत असतात. शेजारून कधी कचर्‍याची गाडी गेली, तरी पोटात मळमळायला होतं. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी याच कचर्‍यात दिवसभर बसून स्वच्छतेसाठी झटणार्‍या महिला म्हणजे स्वच्छतेच्या खर्‍या शिलेदार आहेत.

फाटलेल्या साडीवरच एखादे जुने कापड गुंडाळायचे, वर पूर्ण बाह्यांचा जुना शर्ट चढवायचा, एक मोठे पोते पाठीवर टाकायचे आणि हातात एक काठी घ्यायची. या भांडवलासोबत कचरा वेचणार्‍या महिलांचा दिवस सकाळी साडेपाच ते सहा वाजता सुरू होतो. दिवसभर नागरिकांनी कचरा कुंडीत किंवा मोकळ्या जागी टाकलेल्या कचर्‍याचा ढीग म्हणजे या महिलांसाठी त्या दिवसभराची आर्थिक बेगमी करणारा स्रोत असतो. कोंडाळ्यात उतरून हातातल्या काठीने कचरा हलवायचा आणि त्यातील प्लास्टिकच्या पिशव्या, कागदे, मोडक्या - तोडक्या वस्तू वेगळ्या करायच्या आणि पाठीवरच्या पोत्यात टाकायच्या. या दिनक्रमात दिवसभरात किमान शंभरेक कचराकोंडाळे किंवा कचर्‍याचे ढिग उपसताना तेथील अस्वच्छता, घाण, धूळ, खराब याच्याशी दिवसभर या महिलांचा संबंध येतो. मात्र हे आमचे कामच आहे यामुळे शहर स्वच्छ रहात असल्याचे सुरेखा माने, चांदणी वाघमारे, श्रीदेवी इटकर, शिला मोरे, संगिता विटकर, शोभा विटकर, माला वाघमारे या कचरा वेचक महिलांनी सांगितले. 

रस्त्यावर कचरा वेचणार्‍या यातील काही महिलांना पालिकेने घनकचरा व्यवस्थापनात समाविष्ठ करून घेतले आहे. या महिलांना दिवसाकाठी 300 रूपये मिळतात मात्र इतर महिलांना कचर्‍यात मिळालेले भंगार विकून 100 ते 150 रूपये मिळतात. घरातील सदस्यांच्या पोटाची सोय करून या महिला घरातून बाहेर पडतात. सकाळी 9 वाजता कचरा डेपोमध्ये हजर होतात. शहराचा सर्व कचरा भरून येणार्‍या घंटागाड्या 11 ते 12 वाजेपर्यंत डेपोमध्ये रिकाम्या केल्या जातात. त्याठिकाणी या महिला कचर्‍याचे वर्गीकरण  करत असतात. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचे काम सुरूच असते. रस्त्यांवर, गटारात, जमा झालेल्या कचर्‍यातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करणारे कचरा वेचक शहरातील कचरा व्यवस्थापनाचा भाग आहेत. नागरिक जे जे टाकून देता येईल, त्यातूनच कचरा वेगळा करून शहर स्वच्छ ठेवण्यात यांचा फार मोठा वाटा आहे. 

आरोग्यावर परिमाण...

पालिकांनी घनकचरा प्रकल्पामध्ये या महिलांना समाविष्ठ करून हॅण्डग्लोज, युनिफॉर्म, डोक्यावर टोपी दिली आहे. मात्र ज्या महिलांचा समावेश प्रकल्पात केला आहे, त्यांच्यासाठी या सुविधा उपलब्ध आहेत. ज्या महिला कचरा वेचत फिरत असतात त्याची जेमतेम परिस्थिती आणि उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्यामुळे शहरातील कचराकोंडाळे धुंडाळत फिरणार्‍या महिलांच्या पोटाचा प्रश्न जरी कसाबसा सुटत असला तरी अस्वच्छ वातावरणाच्या परिणामामुळे या महिलांच्या आरोग्याचाही विपरीत परिणाम होत आहे. 

पोरगं शिकलं, परदेशात गेलं..

कराड : अशोक मोहने 

भर पावसात.. तर कधी कडाक्याच्या थंडीत शहर झोपेत असताना आमची ड्युटी सुरू होते.. हातात खराटा घेऊन पहाटे पाचला मुकादमानं दिलेल्या भागात रस्त्यांची साफसफाई करायची.. यावेळी बर्‍यापैकी अंधारच असतो.. शहर जागं व्हायच्या आत आम्ही सफाई कामगार रस्ते झाडून झुडून ठेवतो..या खराट्याच्या आधारावर पोरं शिकली सवरली..एक मुलगा इंजिनिअर झाला..आता तो दुबईला नोकरी करतोय.. केलेल्या कष्टाच चिज झाल्याच समाधान आहे.

कराड नगरपालिकेत गेल्या दहा वर्षापासून सफाई काम करणार्‍या सोनाबाई तिरमारे सांगत होत्या. सासुबाई इंदूबाई तिरमारे यांच्या नंतर अनुकंपा तत्वावर सोनाबाई नगरपालिकेत 2004 मध्ये सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. त्यांनी आयुष्यात खूप सोसलं आहे. पडेल ते काम केलं. पण घर संसाराचा गाडा थांबू दिला नाही.  पती बाजीराव तिरमारे यांच्या व्यसनामुळे घराची वाताहत होण्याची वेळ आली होती. पण त्यांनी धीर सोडला नाही. मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिलं. लहान मुलगा प्रताप शिकला. इंजिनिअर झाला. आज तो दुबईला नोकरी करत आहे.

दरम्यान बाजीराव तिरमारे यांनीही व्यसन सोडले. आज तेही पत्नी सोनाबाई यांना मदत करत आहेत. ही सर्व किमया खराट्याने साधली आहे. वय झाले तरी आजही प्रामाणिकपणे शहर स्वच्छतेचे काम त्या करत आहेत. 

अशीच काहीशी परिस्थिती सफाई कामगार आरती बाळू भोसले यांची आहे. आईच्या जागी त्या सफाई कर्मचारी म्हणून पालिकेत नोकरीस लागल्या. आई सेवेत असतानाही तिच्या आजारपणाच्या काळात  तिच्या बदली जागेवर त्या साफ सफाईसाठी जात होत्या. कधी पहाटे तर कधी रात्री जेवण झाल्यानंतर त्या जाऊन भागाची झाडलोट करतात. ही नोकरी करत त्यांनी आईने  घेतलेले कर्ज  फेडले. कर्जाची काही रक्कम अद्याप शिल्लक आहे, पण ती आवाक्यात असल्याने नवीन कर्ज काढून घरासाठी काहीतरी करण्याचा त्यांचा विचार आहे. अगदी मुलाप्रमाणे अन्य दोन्ही बहिणींची जबाबदारी त्यांची समर्थपणे पेलली आहे. 

या दोघींच्या भेटीनंतर आंबेडकर क्रिडांगणाची शनिवारी दुपारी काही महिला साफसफाई करत होत्या. त्यांना भेटून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्या म्हणाल्या,  आज लोकांना स्वच्छतेचं महत्व पटलं आहे. लोक ओला, सुका कचरा वेगवेगळा करत आहेत. ज्या भागात पूर्वी पाच पाच पोती कचरा निघत हाता त्या ठिकाणाहून दोन पोती कचरा निघतो. स्वच्छ सर्व्हेक्षणमुळे आमच्यावर अधिक जबाबदारी पडली आहे. पण कराड शहर स्वच्छ व सुंदर दिसतयं असे लोक बोलतात तेंव्हा केलेल्या कामाच समाधान मिळतं. 

साहेब खूप चांगले आहेत...

नगरपालिकचे मुख्याधिकारी यशवंत डांगे स्वतः शहर स्वच्छतेच्या कामात अग्रेसर असतात.  कधी नाल्यात उतरतात,  कचर भरतात. त्यांच्यामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते,असे महिला सफाई कामगार म्हणाल्या. तर  आपुलकीने ते आमची विचारपूस करतात. कामगारांच्या अडचणी, त्यांचे प्रश्‍न समजून घेतात, त्यामुळे खूप समाधान वाटते. साहेब खूप चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी यावेळी बोलताना दिली. 

 

Tags : karad, karad news, Waste picker women, problem,