होमपेज › Satara › जिल्ह्यातील 105 जलमनी यंत्रे धुळखात

जिल्ह्यातील 105 जलमनी यंत्रे धुळखात

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 10:58PMसातारा : प्रवीण शिंगटे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे  व जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवता यावे. यासाठी राज्य शासनाने  पाण्यासारखा पैसा खर्च करून  शाळांमध्ये जलमनी पाणी फिल्टर सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, त्या यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्‍न उद्भवल्याने ही लाखो रूपयांची यंत्रणा  पाण्यात गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अशुध्द पाणी  पिवून आपली तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील 193 पैकी 105 शाळांमधील ही यंत्रणा बंद पडली आहे.

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुध्द मिळावे व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी राज्य शासनाने  महत्वाकांक्षी अशी जलमनी योजना सुरू केली. निर्जंतुक तसेच क्षारविरहीत पाणी पुरवण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार शाळांना पाणी शुध्दीकरण यंत्रांचे वाटप करण्यात आले होते. 

सातारा तालुक्यात 19 शाळांमधील सर्वच्या सर्व यंत्रे बंद पडली आहेत. कोरेगावमधील 30 पैकी 12 बंद आहेत. जावलीमधील 13 पैकी 10, खटावमधील 29 पैकी 16, महाबळेश्‍वरमधील 10 पैकी 9, खंडाळा 13 पैकी 6, वाईमधील 12 पैकी 5, कराडमधील 36 पैकी 23, पाटणमधील18 पैकी 5 यंत्रे बंद पडली आहेत.  ही यंत्रे दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून न दिल्याने ही यंत्रे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये धुळखात पडली आहेत. त्यामुळे लाखो रूपये खर्चून शासनाने स्वच्छ आणि शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जे फिल्टर दिले होते ते आता भंगारात जमा होण्याची वेळ आली आहे.

हे फिल्टर बंद पडल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत तात्पुरती डागडुजी, दुरूस्ती करून ही यंत्रे पुन्हा सुरू होवू शकतात. मात्र, ज्या ठेकेदाराकडे या यंत्रांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या ठेकेदाराकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे तर यंत्र दुरूस्तीसाठी संबंधित विभागाकडून याचा पाठपुरावा घेतला असल्यास संबंधित ठेकेदाराचा फोनच बंद येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांमधील  ही यंत्रणा बंद पडल्याने  शाळेतील  शिक्षकांनी जलशुध्दीकरण यंत्र काढून ठेवले आहे. जलमनी कार्यक्रमाअंतर्गत बसविलेल्या  जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षास जूनपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून तरी शालेय विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

Tags : Washing , hydraulic devices, district