Mon, Feb 18, 2019 05:25होमपेज › Satara › वारूगड मोजू लागलाय अखेरची घटका 

वारूगड मोजू लागलाय अखेरची घटका 

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:07PM

बुकमार्क करा

दहिवडी : प्रतिनिधी

माण तालुक्यातील वारुगड, ऐतिहासिक वारसा लाभलेला वारुगड हा किल्ला लँडमाफियांच्या वक्रदृष्टीने व महसूल विभागाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे अखेरच्या घटका मोजत आहे. लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून किल्ल्याच्या पायथ्याला असणारा मुरुम राजरोसपणे उचचला जात असूनही  प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना याचेच काहीच देणे-घेणे नसल्यासारखे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

माण तालुक्यात वारूगड हा गढी प्रकारातील किल्‍ला आहे. याच्या पायथ्यालगत अनेक महिन्यांपासून मुरुमाचे अवैध उत्खनन सुरु आहे. तसेच लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून विनापरवाना बांधकाम सुरू आहे. पुरातन वास्तू, तळी, बारव, विहिरी दिवसा-ढवळ्या मुजवल्या जात आहेत. याबाबत महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. याची माहिती मिळाल्यानंतर शिवप्रेमी नागरिकंनी याबाबत तक्रारी केल्यानंतरही जुजबी कारवाई करून केवळ दिखावा केला जातो.

लँडमाफिया कोण आहेत हे माहित असूनही कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या साट्यालोट्यातून लाखोंचा गैरव्यवहार होत असल्याचाही इतिहासप्रेमींचा आरोप आहे. धनदांडग्यांच्या लालसेपायी ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याप्रकरणात लक्ष घालून ऐतहासिक वास्तू नामशेष करू पाहणार्‍या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  माणचे आ. जयकुमार गोरे हे तर डॅशिंग आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात  याप्रश्‍नी लक्षवेधी दाखल केल्यास पुरातत्व विभाग व प्रशासन तातडीने लक्ष देईल, अशी मागणीही पसिरातील शिवप्रेमींमधून होत आहे.