Mon, Aug 19, 2019 07:16होमपेज › Satara › वांग मराठवाडीचा निर्णय राज्याला दिशादर्शक

वांग मराठवाडीचा निर्णय राज्याला दिशादर्शक

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:23PMढेबेवाडी : प्रतिनिधी

कोयना धरण होऊन 60 वर्षाचा काळ लोटला आहे. तरी धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर 14 हजार धरणग्रस्तांपैकी  11 हजार धरणग्रस्तांचे रेकॉर्ड तयार केले आहे. उर्वरित 3 हजार धरणग्रस्तांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून वांग - मराठवाडीसाठी झालेला निर्णय संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

वांग - मराठवाडीतील ज्या धरणग्रस्तांना जमिनी देता आल्या नाहीत, त्यांनी मागणी केल्यानुसार जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या धनादेशाच्या वितरणप्रसंगी वांग - मराठवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, आ. नरेंद्र पाटील, आ. शंभूराज देसाई, विक्रम पावसकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह प्रशासकीय अधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, वांग - मराठवाडीच्या पुनर्वसनाचा अनेक वर्षाचा रखडलेला प्रश्‍न सोडविताना धरणग्रस्तांना एकरी 17 लाखांप्रमाणे मोबदला देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐतिहासिक आहे. धरणग्रस्तांच्या समस्या कधी सुटत नाहीत, नवनवे प्रश्‍न निर्माण होतात. पण ते प्रश्‍न सोडवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच धरणग्रस्तांनी सुरू असणारे काम बंद पाडू नये, असे आवाहन ना. पाटील यांनी केले.

आता राज्यात नव्याने प्रकल्प होण्याची शक्यता कमीच आहे. म्हणूनच जलयुक्त शिवार योजनेचा स्विकार करत राज्यातील प्रत्येक गावात पडणारा पावसाचा थेंबही वाया जाऊ नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील 16 हजार गावांचा सर्व्हे केला आहे. तसेच मी पुनर्वसन मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला, तेव्हा मागील 60 वर्षापासून धरणग्रस्तांचे पुनर्वसनासह अनेक प्रश्‍न कायम असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आम्ही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या विषयाला प्राधान्य देत असल्याचेही ना. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ. नरेंद्र पाटील, आ. शंभूराज देसाई, भरत पाटील यांच्यासह माधव भंडारी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचीही भाषणे झाली. 

आ. नरेंद्र पाटील यांचा योग्य निर्णय घेण्याचा इशारा

आ. नरेंद्र पाटील यांनी शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्‍नांना हात घातला. पवनचक्क्यांसाठी जमिनी कवडीमोल दराने घेऊन शेतकर्‍यांचे केलेले नुकसान, मंद्रूळ कोळे परिसरातल्या चार गावांच्या जमिनी काढून केलेला अन्याय, महिंद प्रकल्पातल्या गाळ काढण्याकडे झालेले दुर्लक्ष, मराठवाडी जिंती रिंग रोड व अजूनही न सुटलेले प्रश्‍न यांचा आढावा घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा इशाराही आ. नरेंद्र पाटील यांनी दिला.

 

Tags : satara, satara news, Wang Marathwadi, decision,