Tue, Apr 23, 2019 00:27होमपेज › Satara › श्रमिक मुक्ती दलाचा शासनाला इशारा

अन्यथा वांग, तारळीच्या भिंतीवर ध्वजवंदन 

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:16PMढेबेवाडी : प्रतिनिधी

वांग - मराठवाडी धरणग्रस्तांना खास बाब म्हणून शासनाने काही सवलती दिलेल्या आहेत. त्याच धर्तीवर वांग आणि तारळीच्या उर्वरित धरणग्रस्तांनाही त्याच सवलती द्याव्यात, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाकडून करण्यात आली आहे. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास प्रजासत्ताकदिनी श्रमिक मुक्ती दलाकडून दोन्ही धरणांच्या भिंतीवर ध्वजवंदन करू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे.

याबाबतचे निवेदन सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंधल यांना देण्यात आले आहे. वांग - मराठवाडी प्रकल्पातील मेंढ, उमरकांचन येथील काही कुटुंबांना खास बाब म्हणून काही सवलती दिलेल्या आहेत. या माध्यमातून राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत चांगला पायंडा शासनाने पाडला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाने आता याच धर्तीवर वांग व तारळी धरणातल्या उर्वरित धरणग्रस्तांच्या बाबतीतही असाच निर्णय घ्यावा.

तसेच तडसर पँटर्नप्रमाणे एकाच तळावर जमिनी उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी. सर्व गायरान जमिनी सलग संपादन करून त्या धरणग्रस्तांना उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच जलाशयाच्या वरच्या बाजूला गावठाणाचा निर्णय कौतुकास्पद आहे. प्रकल्पातील शेतकर्‍यांच्या शिल्लक जमिनी कसण्यासाठी देण्यात याव्यात. तसेच याठिकाणी सर्व सोयी असलेली गावठाणे तयार करून द्यावीत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली असून याबाबत 26 जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे.