Wed, Jan 22, 2020 02:35होमपेज › Satara › वांग-मराठवाडी धरणग्रस्तांना एकरी १७ लाख 

वांग-मराठवाडी धरणग्रस्तांना एकरी १७ लाख 

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:21PM

बुकमार्क करा

ढेबेवाडी : प्रतिनिधी

वांग-मराठवाडी प्रकल्पबाधित मेंढ आणि उमरकांचन येथील धरणग्रस्तांना एकरी 17 लाख रुपयांप्रमाणे रोख पॅकेज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, डिसेंबरअखेर पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली आहे, अशी माहिती धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुनील मोहिते यांनी दिली. मेधाताई पाटकर गटाच्या धरणग्रस्त कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 

सुनील मोहिते यांनी सांगितले की, आमच्या संघटनेने सांगली जिल्ह्यातील पुनर्वसन नाकारून धरणाच्या वरच्या बाजूस पुररेषेबाहेर पुनर्वसन व बागायती जमीन बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्याइतपत रोख मोबदला, अशी मागणी केली होती. धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाल्याने निधी केंद्राकडून मिळणार आहे. शासनाने  खास बाब म्हणून मान्य केली होती. त्यानुसार सातारा येथे बैठकीत एकरी 17 लाख रूपये मोबदला देण्याचा निर्णय झाला. सदरच्या मोबदल्याचे याच महिन्यात वाटप करण्याचा व वरच्या बाजूस सरकुन गावठाण निर्मिती करून सर्व सेवासुविधा पुरविण्याचा निर्णय सर्वानुमते झाला.

उमरकांचन येथील शामराव मोहिते गुरूजी यांच्या गटाच्या 55 कुटुंबांनी तडसर (ता.कडेगाव) येथील गायरानास पसंदी दिली आहे. बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, कराडचे प्रांत हिम्मत खराडे, पाटणचे प्रांत तांबे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कृती समितीचे सुनिल मोहिते, जितेंद्र पाटील, प्रतापराव मोहिते, विजय भोसले, प्रकाश मोहिते व धरणग्रस्त उपस्थित होते. 

‘गावठाण’बाबत निर्णय

उमरकांचन येथील 80 धरणग्रस्त कुटुंबांसाठी गावठाणनिर्मितीचे काम आठ दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. मेंढ येथील 60 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी गावठाणला जागा उपलब्ध आहे. त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 31 डिसेंबरपूर्वी गावठाण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जिंती येथील 33 कुटुंबांनाही वरीलप्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे.