Tue, Mar 26, 2019 20:17होमपेज › Satara › बिबट्या चालेल पण..कुत्रं आवरा 

बिबट्या चालेल पण..कुत्रं आवरा 

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 8:42PM

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

गेली अनेक वर्षे पाटण तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघाला विरोध होत आहे. मात्र आता शहरासह गावागावात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः जनतेला सळो की पळो करून सोडले असून याबाबत प्रशासन ढिम्म असल्याने आता वनविभागाने गावागावात बिबट्या आणून सोडावेत अशी उपहासात्मक तथा संतप्त मागणी येथील जनतेतून होत आहे. स्वाभाविकच मग यापूर्वी ’ भिक नको कुत्रं आवर ’ याऐवजी ’ बिबट्या चालेल पण कुत्रं आवर ’ अशी नवी म्हण तालुक्यात उदयास येऊ लागली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून पाटण शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात अचानकपणे भटक्या कुत्र्यांचे कळपच्या कळप दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही कुत्री नक्की कोठून व कशी आली याबाबत वनविभागासह कोणालाच कसलीही माहिती नाही. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांनी सर्वांचेच जगणे अवघड करून ठेवले आहे. रस्त्यावरून चालताना नागरिकांवर ही कुत्री कधी आणि कसा हल्ला करतील हे सांगता येत नाही. 

शालेय विद्यार्थी तर याला एवढे घाबरले आहेत की त्यामुळे ते शाळेत जायलाच तयार नसतात. त्यामुळे मुले शाळेत सोडायला व आणायला आपोआपच आई बाबांना नवीन ड्युटी लागली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत ते अगदी पोलीस व वन विभाग यांच्याकडे नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या मात्र प्राणीमित्रांच्या नावाने व कायदा अशी गुळगुळीत उत्तर देवून प्रत्येकजण आपली जबाबदारी टाळत आहेत.

बिबट्यांवर गुन्हा नाही आणि गोधनही वाचणार

अलीकडे मानवी वस्त्यात घुसून शेळी, बकरी, गाय, म्हैशींवर बिबट्या मोठ्या प्रमाणावर हल्ले करीत आहेत तर मग त्याच्या आवडीचा कुत्रा प्राणी जर त्याला मिळाला तर आपोआपच या कुत्र्यांचा बंदोबस्त होइल व गोधनही वाचेल आणि कायदा अथवा प्राणीमित्र हे त्या बिबट्यांवर कोणताही गुन्हा अथवा कारवाई करू शकणार नाहीत अशा उपहासात्मक चर्चा येथे सुरू आहेत.