Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Satara › मायणी परिसराला तारळीच्या पाण्याची प्रतीक्षा

मायणी परिसराला तारळीच्या पाण्याची प्रतीक्षा

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 8:59PMमायणी : पोपट मिंड

खटाव तालुक्यामध्ये उरमोडी, जिहे कठापूर,तारळी या पाणी योजनांचे लाभक्षेत्र येते. परंतु, या योजना आजही शंभर टक्के पूर्णत्वास गेल्या नसल्याने खटाव तालुक्यातील काही भागाला योजनेचे पाणी मिळाले असले तरी अद्याप मायणीसह कलेढोण व अन्य छोटी खेडी पाण्यापासून वंचित आहेत. तारळी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत असलेल्या गावात आजही शेती पाण्याचा ठणठणाठ आहे.

एक बाजूला पाण्याने भरून वाहणारे कालवे तर दुसर्‍या बाजूला अपूर्णावस्थेत असणारे पाणी नसलेले कालवे पाहण्याची वेळ या भागातील जनतेवर आली आहे. शेतीसाठी सोडाच पण पिण्याच्या पाण्यासाठी येथील जनता टाहो फोडत आहे.या भागातील नेते मंडळी हक्काचे असलेले व थोड्या प्रयत्नात मिळणारे पाणी मिळवण्यासाठी आग्रही न राहता पाणी प्रश्‍नांचे राजकारण करण्यात मशगूल आहेत.

दुष्काळी खटाव तालुक्याच्या शेती पाण्याचा प्रश्‍न खटावचे माजी आ.कै.भाऊसाहेब गुदगेंनी आपल्या कारकिर्दीत तालुक्यासाठी पाणी राखीव ठेवून मार्गी लावला. तालुक्यातील कॅनालची कामेही मार्गी लावली होती. अपूर्ण अवस्थेत असलेल्या कॅनालची कामे पूर्ण करण्यात तालुक्याची तथाकथित नेते मंडळी अपयशी ठरलीत. 

या भागातील धोंडेवाडी ता. खटाव येथील कालव्याच्या पुलाचे काम रखडल्याने तर काही ठिकाणी कामे संथ गतीने सुरू असल्याने मायणी भागात पाणी येण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.  250 कोटी रुपयांच्या उरमोडी योजनेचे बजेट आज एक हजार कोटी रुपयांचा आकडा ओलांडला तरीही ही योजना अद्याप पूर्णत्वास गेली नाही, ही शोकांतिका आहे. याच योजनेप्रमाणे अन्य योजनांची सध्याची परिस्थिती आपणास पहावयास मिळत आहे.

गेल्याच आठवड्यात कातरखटाव भागात कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले असल्याने ऐन उन्हाळ्यात ओढे वाहिल्यानेे या भागातील विहिरी, बोअरवेलला पाण्याचे पाझर फुटल्याने या भागातील शेतकरी आनंदून गेला आहे. परंतु या भागातून वाहणारे पाणी पाहून मायणी जि. प. गटातील शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. 

सध्या खटाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. या यादीत मायणी जि. प. गटातीलच सर्वाधिक गावांचा समावेश असल्याचे आढळते. उरमोडी योजनेचे पाणी  आपल्या शिवारात येणार, हे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून पाहत असलेली जनता आज टेंभू योजनेचे पाणी पिण्यासाठी का होईना परंतु मायणी तलावात केव्हा येणार? असा प्रश्‍न विचारीत पाण्याची प्रतिक्षा करताना दिसून येत आहे.

तारळी प्रकल्पातील बाधित धरणग्रस्तांचे मायणी येथे पुनर्वसन झाले आहे. त्या लोकांना जमीनी मिळाल्यात पण, पाणी आजूनही न मिळाल्याने त्यांच्या त्यागाला न्याय मिळणार आहे की नाही? असा प्रश्‍न प्रकल्पग्रस्तांनी  विचारला आहे. कोरडे पाट किती दिवस पहायचे? आमची पिढी पाणी येण्याची आश्‍वासने ऐकून संपली. नवीन पिढी तरी पाणीदार होईल का?असा प्रश्‍न मायणी, धोंडेवाडीसह तारळी लाभ क्षेत्रातील जनता विचारीत आहे.