Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Satara › ‘कोयने’ला लागली पावसाची ओढ

‘कोयने’ला लागली पावसाची ओढ

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:10PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना धरणात सध्यस्थितीत गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल दहा टीएमसी जादा पाणीसाठा आहे. मात्र असे असले तरी जून महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यासह कोयना धरणालाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. सध्यस्थितीत धरणात 26.66 टीएमसी पाणीसाठा आहे. तर यापैकी उपयुक्त साठा हा 21.66 टीएमसी इतका असून सिंचनाची व वीज निर्मितीची गरज, मागणी लक्षात घेता जवळपास अजूनही एक महिना हा पाणीसाठा पुरणार आहे. 

मात्र असे असले तरी पावसाने दिलेली उघडीप पाहता पुरेसा पाऊस न झाल्यास त्या पुढील काळात काय ? हा देखील महत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हवामानासह पावसाचा लहरीपणा लक्षात घेत धरण व्यवस्थापन असो किंवा वीज निर्मिती कंपनी या दोन्ही ठिकाणाहून धरणातील पाणी वापरावर मर्यादा आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात पूर्वेकडील सिंचनासाठी केवळ 0.81 टीएमसी तर पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 1.60 टीएमसी इतकेच पाणी वापरण्यात आले आहे. याच पाण्यावर 71.558 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. .शुक्रवारपर्यंत कोयना येथे एकूण 215 मि. मि. , नवजा 168 मि. मि. तर महाबळेश्‍वर येथे 230 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. 

गेल्यावर्षी धरणात सध्यस्थितीत 16.87 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत सध्या येथे 26.66 टीएमसी पाणीसाठा हा निश्‍चितच समाधानकारक आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतातील पेरण्यांसाठी शेतकरी खोळंबल्याचे पहावयास मिळत आहे. संपूर्ण पावसाळ्यात येथे सरासरी चार हजाराहून अधिक मिलीमीटर पाऊस होतो. त्यानंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवीत होतात. त्यामुळे जून ते सप्टेंबर या पावसाच्या मुख्य कालावधीत येथे अपेक्षित पाऊस पडणे तितकेच महत्वाचे ठरते. एकूणच सध्याचा पाणीसाठा अजूनतरी दिलासादायक आहे. गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा व त्याचपटीत वीज निर्मिती या बाबी समाधानकारक आहेत. मात्र येत्या आठवडाभरात तरी दमदार पाऊस पडावा, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.