Sun, Jul 21, 2019 08:24होमपेज › Satara › ठेव परत करताना फसवणूक

ठेव परत करताना फसवणूक

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:32PMवडूज : वार्ताहर

येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील ठेवीचे पैसे परत मिळण्याकामी एक लाख रुपयांचे कमिशन  घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वडूज येथील संजय जोतिराम गोडसे यांनी वडूज पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी वसुली कर्मचारी जालिंदर येवले यास पोलिसांनी अटक केली असून, त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय गोडसे व त्यांच्या पत्नी जयश्री गोडसे, मुलगा गणेश गोडसे या तिघांच्या नावे चैतन्य पतसंस्थेत सुमारे अकरा लाखांच्या ठेवी आहेत. या ठेवींची मुदत संपून देखील व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात होती. ठेवीचे पैसे परत देण्यासाठी मुंबई येथील फायनान्स कंपनीकडून 90 लाखांचे कर्ज काढण्यात येणार आहे. त्या कर्जासाठी मध्यस्थाला कमिशन देणे गरजेचे आहे. याकरिता ज्यांना ठेवीचे पैसे परत पाहिजे आहेत, अशा ठेवीदारांनी प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत, अशी मागणी व्यवस्थापनाकडून झाली. त्यामुळे आपण एक लाख रुपये दिले. कमीशनची रक्कम घेऊनसुद्धा ठेवीचे पैसे परत देण्यास टाळाटाळ होत आहे. म्हणून संजय गोडसे यांनी व्यवस्थापक जालिंदर येवले याच्यासह चेअरमन संजय दिगंबर इनामदार, त्यांच्या पत्नी ज्योती संजय इनामदार, भावजय कांचन गजानन इनामदार या चौघांजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

त्यांपैकी जालिंदर येवले यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. अधिक तपास हावलदार शांताराम ओंबासे करीत आहेत.