होमपेज › Satara › मूलभूत सुविधांसाठीही डोंगरदर्‍यातून पायपीट

मूलभूत सुविधांसाठीही डोंगरदर्‍यातून पायपीट

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:08PMशेणोली : सुरेश जगताप 

विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. खेडोपाडी विकासाची गंगा अवतरली असली तरी कराड तालुक्यातील वडगाव हवेलीशेजारील भीमकुंडमध्ये मात्र अजूनही विकासासाची गंगा पोहोचलीच नाही. आजही या ठिकाणचे लोक विकासापासून वंचित आहेत. दैनंदिन जीवन जगत असताना असंख्य समस्यांचा सामना करीत आपले जीवन जगत आहेत.

भीमकुंड लोकवस्ती वडगांव हवेली (ता. कराड) गावची असलीतरी डोंगरावर सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेली आहे. पेशवाईच्या काळात वडगांव येथील चिटणीसांना येथील शेकडो हेक्टर जमीन इनाम म्हणून मिळाली होती. सदर जमीनेची राखण करण्यासाठी वडगांव येथील मातंग समाजातील वायदंडे कुटुंबातील सदस्य या ठिकाणी वास्तव्यास आले. आजमितीस पंधरा कुटुंबे व साधारण ऐंशी नव्वद लोकसंख्या येथे लोकवस्ती करून राहत आहेत. येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विज वितरण कार्यालय, बँक, स्वस्त धान्य दुकान आदी कामासाठी डोंगर उतरून तीन कि.मी. पायी चालत अथवा सोनसळ- शेरेस्टेशन मार्गे बारा कि.मी. अंतर पार करून वडगांव येथे यावे लागते.लोकवस्तीवर किराणा दुकान, पीठाची गिरण नसल्याने मुलभुत गरजांच्या पूर्तीसाठी शेजारच्या सोनसळ गावी एस टी किंवा खासगी वडाप, वाहतुकीची साधने नसल्याने पायी चालत जावे लागते.   पूर्वी रेठरे, गोंदी, शेरे, शेणोली, वडगांव, दुशेरे, कोडोली आदी गावातील लोक पायी पंढरपूर महिेन्याच्या वारी परिक्रमेसाठी या मार्गे जात असत.पांथस्थांचे मुक्कामी सोयीसाठी या ठिकाणी धर्मशाळा होती. काळओघात ती नामशेष झाली असून सध्या या ठिकाणी खुल्या जागेवर अतिेक्रमण झाले आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी समाजमंदिर नसल्याने ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 

पशुधनाची सोय नाही 

लोकवस्तीवरील लोकांच्या पशुधनाची सोय व्हावी म्हणून जि.प. व ग्रामपंचायतमार्फत जनावरांसाठी खोडा उभारण्यात आला आहे. वडगांव येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना असून सदर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून येथील शेतकरीवर्गाच्या पशुधनाची देखभाल, लसीकरण, उपचार आदी सोयीसाठी खोडाचे निर्माण करण्यात आले होते. परंतु आजअखेर या खोडाचा वापर झाला ना आजअखेर पशुवैद्यक या ठिकाणी आला. खोडाचा वापर जनावरांना न होता लहान मुलांना खेळण्यासाठीच आजवर झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सन 2007 पूर्वी येथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवायचे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी सायकल अथवा बैलगाडीतून सोनसळ शिरसगाव येथून पाणी आणावे लागायचे. जि.प.चे माध्यमातून या ठिकाणी तीन सिमेंट बंधारे बांधले नंतर पाण्याचा मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. 

वडगांव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली असून या टाकीच्या माध्यमातून लोकवस्तीवर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा टाकीपासून वितरण व्यवस्था नसल्याने प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार  रबरी पाईप जोडून पाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. टाकी उंचीवर नसल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही.लोकवस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शंभु महादेवाचे मंदिर पंधरेा वर्षांपूर्वी बांधले आहे. सदर मंदिर बांधकाम निर्मितीपासून येथील मंदिरात विजेची सोय व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, विजे अभावी मंदिरात काळोखाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ अंधारात 

येथील लोकवस्ती सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील डोंगरावर वसली असल्याने येथे सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथील सबस्टेशनवरून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे येथील लोकवस्तीवरील विज बिघाड झाल्यास वडगांव विज कार्यालयास कळवावे लागते विज वितरणचे कर्मचारी तक्रार दाखल झाल्यानंतरही चार पाच दिवस इकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करीत दिवस काढावे लागतात. 

तीन कि. मी. वर अंगणवाडी, शाळा

भिमकुंडमधील लोकवस्ती शैक्षणिक सुविधांपासून कोसो दूर आहे. शैक्षणिक सुविधेअंतर्गत शाळा, अंगणवाडी असे कोणतेच साधन उपलब्ध नाही. लोकवस्तीवर अंगणवाडी नसल्याने लहान मुलांना तीन कि.मी. अंतरावरील सोनसळ अंगणवाडीत न्यावे लागले. सोनसळ येथे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सात कि.मी. अंतरावरील शिरसगाव येथे पायी जावे लागते आहे.

निर्मलग्राम योजना पोहोचलीच नाही  

शासनस्तरावर ग्रामस्वच्छतेस प्राधान्य दिले जाते आहे. शौचालय निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाते आहे. परंतु येथील मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बर्‍याचशा कुटुंबाकडे शौचालये नाहीत. शासन गावोगावी सार्वजनिक सुलभ शौचालये निर्माण करून गावे निर्मलग्राम करीत आहे. परंतु सदर लोकवस्तीवर सार्वजनिक सुलभ शौचालय नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजास्तव खुल्या जागेत शौचास जावे लागत आहे.

स्मशानभूमी नाही, शेतातच अंत्यसंस्कार 

सत्तर ते ऐंशी लोकसंख्या असणार्‍या या लोकवस्तीसाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी नाही. स्मशानभूमीच्या अभावामुळे वस्तीवरील लोकांना आपल्या नातलगांचे निधन झाल्यावर स्वतःच्या शेतात अथवा ओढ्याकडेला जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार करावे लागतात.  या वस्तीला कायमस्वरूपी स्मशानभूमीची आवश्यकता आहे. पावसाळ्यात तर मोठी गैरसोय होते. 

आरोग्य अधिकारी फिरकत नाहीत

वडगांव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत येथील लोकवस्तीवरील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. शासनामार्फत देण्यात येणारी मोफत औषधे, लसीकरण आदी गोष्टींसाठी प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी महिन्यातून एकदा या लोकवस्तीस भेट देतात.परंतु गेल्या चार महिन्यांपासून या लोकवस्तीवर आरोग्य कर्मचारी फिरकलेच नाहीत. पावसाळ्यात विविध आजार व साथींची लागण होण्याची दाट शक्यता आहे.