Thu, Apr 25, 2019 05:55होमपेज › Satara › ‘पुढारी’नेच राज्यकर्त्यांचे कान टोचावेत

‘पुढारी’नेच राज्यकर्त्यांचे कान टोचावेत

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:09PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

राज्य गंभीर परिस्थितीतून जात आहे. सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. सामान्य जनतेला न्याय हवा आहे. लोकांच्या जशा विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडून अपेक्षा आहेत तशाच राज्यकर्त्यांवर अंकुश म्हणून तुमच्याकडूनही अपेक्षा आहेत. गंभीर परिस्थितीत आता पुढारीनेच राज्यकर्त्यांचे कान टोचावेत, अशी अपेक्षा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी केली.

जिल्हा तालीम संघाच्या मैदानावर सातारा शहरात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभासाठी अजित पवार आले होते. त्यानंतर त्यांनी आवर्जून ‘पुढारी’ कार्यालयात येण्याची इच्छा व्यक्त केली. ‘पुढारी’चा  वर्धापन दिनाचा सप्‍ताह सुरू असतानाच अजित पवार यांंनी ‘पुढारी’च्या सातारा कार्यालयाकडे आपले पाय वळवले. ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना त्यांनी अभिवादन केले. ‘पुढारी’ने आजपर्यंत विविध सामाजिक विषयांना हात घातला आहे. सातार्‍यात तर मी पालकमंत्री असल्यापासून तुमचे व माझे स्नेहाचे संबंध निर्माण झाले आहेत.

मी सत्तेवर असो अथवा नसो, सातार्‍यात ‘पुढारी’ नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, याचा अभिमान वाटतो. तुमची टिम तरुण व तडफदार आहे. सातार्‍यातील प्रसारमाध्यमे नेहमीच चांगल्याची बाजू घेत असतात. ‘पुढारी’चा या कामात मोठा पुढाकार असतो, याचा मला अभिमान आहे. जिथे जिथे चुकले तिथे तिथे राज्यकर्त्यांना चुका दाखवण्यात ‘पुढारी’ कधी कमी पडला नाही, याचा मी अनुभव घेतला आहे. आता विपरीत परिस्थितीतही ‘पुढारी’ने राज्यकर्त्यांचे कान टोचावेत आणि तुम्हीच ते करू शकता, असेही अजित पवार आवर्जून म्हणाले, यावेळी  त्यांनी कार्यालयातील कामकाजाची माहिती घेतली.

‘पुढारी’च्यावतीने ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण, वृत्त संपादक हरीष पाटणे, मार्केटिंग मॅनेजर नितीन निकम, कार्यालयीन अधीक्षक सचिन कदम, तालुका प्रतिनिधी प्रकाश गायकवाड, इम्तियाज मुजावर यांच्यासह ‘पुढारी’ परिवाराने अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार दिनानिमित्त अजित पवार यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बॉक्सिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुजीत आंबेकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक बाळासाहेब साळुंखे, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजित साळुंखे, निलेश कुलकर्णी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.