Thu, Apr 25, 2019 18:23होमपेज › Satara › पळाऽऽ पळाऽऽ पीआरसी आली

पळाऽऽ पळाऽऽ पीआरसी आली

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 11:13PMसातारा : प्रवीण शिंगटे

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायतराज समिती (पी.आर.सी.) दि. 24 ते 26 एप्रिलदरम्यान सातारा जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. पीआरसीचा दौरा म्हणजे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अंगावर काटाच येत असून सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचार्‍यांची आपापल्या विभागाची माहिती अपडेट ठेवण्यासाठी पळता भुई थोडी झाली आहे. यापूर्वी 2 वेळा पंचायतराज समितीचा दौरा रद्द झाला होता; मात्र आता तो पुन्हा जाहीर झाल्याने संबंधितांना धास्ती लागून राहिली आहे. 

पंचायतराज समिती म्हणजेच पीआरसी होय. ही समिती दि. 24, 25 व 26 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात येत आहे. ही समिती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यासह विविध विभागांना भेट देवून पाहणी करणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग पंचायत राज समितीच्या दौर्‍यामुळे अलर्ट झाले आहेत.  ही समिती सन 2012 व 13 चे लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन 2013 व 14 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात सातारा  जिल्हा परिषदेस भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष घेणार आहे. 

पंचायत राज समिती  दौर्‍याच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महाराष्ट्र  विधानमंडळ सचिवालयाकडून आलेले पत्र  जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाला धाडले आहे.  त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची अपडेट राहण्यासाठी  धांदल सुरू झाली आहे. 

पंचायत राज समिती सन 2012 व 13चे लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन 2013 व 14 च्या वार्षिक प्रशासन अहवालावरील प्रश्‍नावली याबाबत प्रश्‍न उत्तरे स्वरूपात लागणारी माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी   व कर्मचारी तत्पर झाले आहेत. इतरवेळी हे अधिकारी व कर्मचारी दररोज बैठकांच्या नावाखाली दांडी मारत असतात मात्र पीआरसीच्या दौर्‍यामुळे जिल्हा परिषदेत सर्वच विभागातील अधिकारी अलर्ट झाले आहेत. 

असा आहे तीन दिवसांचा दौरा

मंगळवार दि.24 रोजी सकाळी 10 ते 10.30 यावेळेत पंचायत राज समिती शासकीय विश्रामगृहावर सातारा जिल्ह्यातील विधानमंडळाच्या सदस्यांशी अनौपचारीक चर्चा करणार आहे. 10.30  ते 11 यावेळेत सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा, 11 वाजता  सन 2012 व 13 च्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील सातारा जिल्हा परिषदेच्या  संबंधातील  परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची जि.प. सभागृहात समिती साक्ष घेणार आहे. बुधवार दि. 25 रोजी सकाळी 9 पासून  जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि.प. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची साक्ष  समिती घेणार आहे. गुरूवार दि.26 रोजी सकाळी 10 पासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन 2013 व 14 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेण्यात येणार आहे.

अशी आहे पंचायतराज समिती

समितीमध्ये  आ. सुधीर पारवे हे प्रमुख असून आ. चरण  वाघमारे, आ. राहुल कूल, आ. देवराव होळी,  आ. सुधाकर भालेराव, आ. भरतशेठ गोगावले,  आ. राजेश क्षीरसागर, आ. राहुल बोंद्रे, आ. वीरेंद्र जगताप, आ. राहुल मोटे, आ. प्रवीण दरेकर, आ. विक्रम काळे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. श्रीकांत देशपांडे, आ. बाबुराव पाचर्णे, आ. रणधीर सावरकर, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश खाडे, आ. सुधाकर कोहळे, आ. किशोर पाटील, आ. तुकाराम काते, आ. दिलीप सोपल, आ. दीपक चव्हाण, आ. तानाजी सावंत, आ. सतीश चव्हाण, आ. बाळाराम पाटील, आ. दत्तात्रय सावंत अशा 28 आमदारांचा समावेश आहे.