Sun, Jul 21, 2019 02:11होमपेज › Satara › खंडाळा पंचायत समितीच्या कारभाराचे वाभाडे 

खंडाळा पंचायत समितीच्या कारभाराचे वाभाडे 

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:52PMलोणंद : प्रतिनिधी

पंचायती राज समितीने गुरुवारी खंडाळा पंचायत समितीला भेट दिली असता समितीला केवळ ‘इमारतीला कार्पोरेट लूक तर आतून भोंगळ कारभार’ समोर आल्याची माहिती समोर आली. विविध विभागांच्या आयोजित बैठकीलाही काही अधिकारी गैरहजर तर हजर असणार्‍यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याने पीआरसी सदस्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. तसेच निर्मलग्राम तालुक्याच्या पंचायत समितीच्या आवारातील स्वच्छतागृहांची अवस्था पाहून पीआरसीने गटविकास अधिकारी व अन्य अधिकार्‍यांच्या कामकाजावर अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त करत चार दिवसात शौचालयाची दुरूस्ती करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. पीआरसीने अधिकार्‍यांच्या कारभाराचे वाभाडे काढले व त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली. मार्चएंड संपला तरी पंचायत समितीने अद्यापही 17 लाख रुपये खर्च केलेले नाहीत. निधी खर्च करण्याची अक्‍कल अधिकारी व पदाधिकार्‍यांकडे नसल्याचेच पीआरसीसमोर सिद्ध झाले. 

पंचायत राज समितीच्या उपसमितीचे अध्यक्ष आ. विक्रम काळे, सदस्य आ. दतात्रय सावंत, आ. श्रीकांत देशपांडे, विधान सभेतील लिपीक किशोर आरेकर, कांबळे, प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी गुरुवारी खंडाळा पंचायत समितीच्या इमारतीची पाहणी करून अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. तसेच अहिरे ग्रामपंचायत, प्रा. आरोग्य केंद्र, जि. प. शाळा यांची पाहणी केली. यावेळी आ. मकरंद पाटील यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

समितीचे आगमन पंचायत समितीच्या आवारात आल्यानंतर आ. विक्रम काळे, आ. श्रीकांत देशपांडे, आ. दतात्रय सावंत यांनी प्रथम स्वच्छतागृहांची पाहणी केली. यावेळी  स्वच्छतागृहांची दुरवस्था तसेच महिला व  पुरुषांच्या शौचालयाला लावलेली कुलपे पाहुन गटविकास अधिकारी व अन्य अधिकार्‍याची झाडाझडतीच घेतली. चार दिवसात दोन्ही  शौचालयाची दुरूस्ती करुन सुरू करण्याच्या सुचना बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. 

समितीने ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, पशुवैद्यकीय, आरोग्य, एकात्मिक बालविकास प्रकल्प आदी  खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी व प्रसारमाध्यमांना प्रवेश दिला नाही. बैठकीत विविध खात्यांच्या कामकाजावर समितीने ताशेरे ओढत अनेकांची झाडाझडती घेतली. काही अधिकारी गैरहजर तर काहीनी चुकीची माहिती दिली. या अधिकार्‍यांवर कारवाईची शिफारस केली. पंचायत समितीचा मार्च एंड अजून संपला नसून 17 लाखांचा निधी  कशावर खर्च करायचा आहे, हेच निश्‍चित झाले नसल्याचे पंचायत राज समितीने पदाधिकार्‍यांच्या निर्दशनास आणून दिले असता पदाधिकार्‍यांनाही काही सांगता आले नाही. पशुवैद्यकिय अधिकार्‍यांनी आफ्रिकन जातीच्या मका बियाणाचे वाटप मार्च संपून गेला तरी झाले नसल्याचे दिसून आल्याने अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील समन्वय नसल्याचे स्पष्ट होवून पंचायत समितीच्या कारभाराचे पीआरसीपुढे पुरते वाभाडे निघाले . त्याच बरोबर दोन शिक्षण विस्तार अधिकारी व दोन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यावरही कारवाईची शिफारस केल्याची माहिती समजली.

दरम्यान, पीआरसीने आमदार आदर्श योजनेत ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दत्तक घेतलेल्या अहिरे गावची ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, यांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. येथील कामकाजाचे समितीने कौतुक करून मार्गदर्शन केले. यावेळी आ. मकरंद पाटील उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना आ. विक्रम काळे म्हणाले, खंबाटकी घाटातील एस कॉर्नर काढणे, खंडाळा येथील मंजुर ट्रामा केअर सेंटरच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावणे, पंचायत समितीची नवीन इमारत बांधणे, अंगणवाडीतील रिक्त पदे भरणे, लोणंदच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावणे, आदी प्रश्‍नाची सोडवणुक करण्याची शिफारस समितीचे वतीने केली जाणार आहे. गैरहजर अधिकार्‍यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. खंडाळा तालुका हा सधन तालुका असताना अंगणवाडीतील अतितीव्र गटातील मुलांची संख्या अधिक आहे. ही गंभीर बाब त्यासाठी प्रयत्न करण्याची शिफारस केली जाईल. 

यावेळी पं. स. सदस्य चंद्रकांत यादव यांनी पीआरसीला निवेदन दिले.  आमचा गाव आमचा विकास योजनेची चौकशी व्हावी, सीएसआर फंडातून  बनवलेला लॉकीम कंपनी ते देवघर (पुन.) रस्ता निकृष्ट दर्जाचा असून एका  कंपनीच्या संगनमताने रस्त्याचा मार्ग बदलला, यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

झाडाझडतीनंतर महिला अधिकार्‍यास अश्रु अनावर

पीआरसीच्या झाडा झडतीनंतर बहुतांश अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर प्रचंड तणाव दिसत होता. एका महिला अधिकार्‍याने तर पीआरसीच्या आमदारांसमोरच अश्रुंना वाट मोकळी करून दिली. दुसरीकडे पीआरसी कुठं आहे, कोणत्या गावात, कोणत्या शाळेत, कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये  जाणार , कोणत्या अंगणवाडीची पाहणी करण्यास जाणार याची माहिती घेण्यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांचे फोन पंचायत समिती परिसरातील संबधित उपस्थिताकडे येऊन माहिती घेतली जात होती. दुपारी पीआरसी वाईकडे रवाना झाल्यानंतर अधिकारी ,कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. सकाळी सातला भरलेल्या शाळाही त्याच दरम्यान सोडल्या. पीआर सीच्या पार्श्‍वभुमीवर पंचायत समितीला रंगरंगोटी, स्वागत कमान, ग्रीन व रेड कार्पेट, फूलझाडांच्या कुंड्या आणून सभागृहास कार्पोरेट लुक दिला होता.  पीआरसी येणार याची माहिती पंचायत समितीने कर्मचारी वगळता कोणालाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे एकही नागरीक समस्यांचे निवेदन घेऊन आला नव्हता. त्यामुळे पीआरसीमधील काहीनी नाराजी व्यक्त केली. 

मकरंद पाटील तुम्ही कुठे कुठे भोके मुजवणार?

लोणंद : प्रतिनिधी : खंडाळा पंचायत समितीचा कारभार दळभद्री सुरू आहे. कार्यक्षमतेची दिवाळखोरी दिसत आहे. पदाधिकारी किती वेळ पंचायत समितीत असतात? अधिकारी नेमके काय करतात? खंडाळा पंचायत समिती आजवर आदर्श पंचायत समिती म्हणून नावारूपाला आली होती. पीआरसीसमोर पंचायत समिती नव्हे तर तालुक्याच्या कारभाराची लक्‍तरे निघाली आहेत. प्रशासनावर पदाधिकार्‍यांचा अंकुश असायला हवा व मुळातच पदाधिकारी कसा नैतिकद‍ृष्ट्या सक्षम असायला हवा. इथे मात्र सोम्या जुगार खेळतोय आणि गोम्या उकळाउकळी करतोय! (तुर्तास एवढंच... बाकी बराच मालमसाला लवकर जनतेपुढे आणू !) अशी पद्धत आहे. लोकप्रतिनिधीने चुकणार्‍याला सुनावले पाहिजे, कारभारात बदल घडवून आणला पाहिजे. मकरंद पाटील तुम्ही कुठे कुठे भोके मुजवणार आहात? घरची माणसं चुकांकडे दुर्लक्ष करतात, चुकांवर पांघरून घालतात पण बाहेरून त्रयस्थ यंत्रणा  ‘झाकलेलं कोंबडं’ टोपलीबाहेर काढतेच. पीआरसीने नेमकं तेच केलं.  ‘आपला तो बाब्या,दुसर्‍याचं ते कार्ट’ ही पद्धत बदलली नाही तर पदाधिकारी व अधिकार्‍यांचा झोल यापुढे खंडाळ्याची जनता सहन करणार नाही.