होमपेज › Satara › पीआरसीच्या दौर्‍याने झेडपी ‘अलर्ट’

पीआरसीच्या दौर्‍याने झेडपी ‘अलर्ट’

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:14PMसातारा : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती दि.11 ते 13 एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेला भेट देणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहासह इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली असल्याने परिसर उजळून निघाला आहे. झेडपीचे अधिकारी व कर्मचार्‍यांची मंगळवारी सकाळपासूनच लगीनघाई सुरू होती. दरम्यान, समितीमधील आमदार व मंत्रालयातील काही अधिकारी मंगळवारी सातार्‍यात दाखल झाले. 

पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर  पारवे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सुमारे 28 आमदारांचा ताफा तीन दिवस सातारा येथे मुक्काम करणार आहे.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहातील जुनी आसनव्यवस्था काढून मंत्रालयातील दालनाप्रमाणे नवीन लूक देवून सी आकाराचे डायस  उभारण्यात आले आहे. त्यामुळे समितीमधील सर्व आमदार एकत्र बसून समोर मंत्रालयातील अधिकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सभागृहातील गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडलेली  वातानुकूलित सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

समितीच्या निवासाची व्यवस्था विश्रामगृह, हॉटेल प्रीती व हॉटेल राजतारा येथे करण्यात आली आहे.आमदारांसाठी संपर्क अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दौर्‍यानिमित्त मंगळवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेतील सर्व विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची रात्री उशिरापर्यंत लगीनघाईच सुरू होती.  ज्या त्या अधिकारी व कर्मचार्‍यांना नेमून देण्यात आलेली कामे करताना दिसत होती. सन 2012-13 व 2014 या कालावधीत जिल्हा परिषदेत असलेले अधिकारी सध्या मिनीमंत्रालयात तळ ठोकून आहेत. त्यांच्या कार्यकाळात काढलेल्या लेखा आक्षेपासह वार्षिक प्रशासन प्रश्‍नावलीवर संबंधित अधिकारी अभ्यास करताना दिसत होते. समितीमधील पदाधिकारी व आधिकार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज आरोग्य पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

पंचायत राज समिती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यासह विविध विभागांना भेट देवून पाहणी करणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग पंचायत राज समितीच्या दौर्‍यामुळे अलर्ट झाले आहेत. बुधवार दि. 11 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत जिल्ह्यातील आमदार व जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांशी अनौपचारिक चर्चा करणार आहे. 11 वाजता  सन 2012 व 13 च्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील सातारा जिल्हा परिषदेच्या  संबंधातील  परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची जि.प. सभागृहात समिती साक्ष घेणार आहे.

गुरूवार दि. 12 रोजी सकाळी 9 पासून  जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि.प. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायती व अंगणवाड्यांना भेटी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची साक्ष  समिती घेणार आहे. शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी 10 पासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन 2013 व 14 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेण्यात येणार आहे.

 

Tags : satara, satara news, satara zp, Maharashtra Legislature Panchayat Raj Committee, Visit,