Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Satara › व्हिजन कीटकनाशक फवारणीचे

व्हिजन कीटकनाशक फवारणीचे

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 11:43PM

बुकमार्क करा
सातारा : अंकुश सोनावले कृषि सहाय्यक नागठाणे

एकात्मिक  किड रोग पध्दतीचा अवलंब  करणे-  किड व रोगाच्या नियंत्रणासाठी  नांगरणी, कुळवणी, भर  देणे ही पुर्वमशागत व आंतरमशागतीची कामे सकाळच्या वेळीच करावी म्हणजे  हुमणी, तसेच इतर किडींचे  कोष  पक्षी  वेचून खातात व पुढे येणारा किडीचा प्रादुर्भाव रोखता येतो. रात्रीच्या वेळी किंवा कडक उन्हात ही कामे केल्यास पक्षी उपलब्ध होत नाहीत. हरभरा, सोयाबीन, वांगी या सारख्या 
पिकांमध्ये इंग्रजी टी आकाराचे एकरी 8 ते 10 पक्षी थांबे उभारावेत. जेणेकरून सकाळच्या वेळी पक्षी त्या थांब्यावर बसून आळ्या वेचून खातात. फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला सारख्या पिकामध्ये बॅक्युल्युर युक्त फळमाशी सापळा, सोयाबीन, हरभरा, सारख्या पिकात हेलिल्युर युक्त कामगंध सापळा, वांगी पिकामध्ये शेंडा पोखरणार्‍या आळीसाठी ओटा ट्रॅप, हुमणी, तसेच टोंमॅटो सारख्या पिकावरील फळ पोखरणार्‍या आळीसाठी प्रकाश सापळा, या सारखे  सापळे  वापरल्यास किडींचे अतिशय  कमी खर्चात  नियंत्रण होते. 

त्यांची आर्थिक नुकसान पातळी  समजण्यास सुध्दा मदत होते.  मुख्य पिकामध्ये चवळी, मुग, मोहरी, यासारखी सापळा पिके, मुख्य पिकाच्या बाजुने तसेच मुख्य पिकाच्या आठ ओळी नंतर एक ओळ मका, ज्वारी, झेंडू सारखी सापळापिकांची   लागवड केल्यास तसेच पट्टा पध्दतीने पिकाची लागवड केल्यास किड   रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. हानीकारक किडी रोगांवर  उपजिविका करणारे लेडी बर्ड बिटल, क्रिप्टोलिमस, क्रायसोपर्ला, मायक्रोमस, ट्रायकोग्रामा यासारख्या  परोपजिवी मित्रकिटकांचे शेतात संवर्धन करणे.  दशपर्णी अर्क, कडूलिंब अर्क (निमार्क) यासारख्या वनस्पतीजन्य  किड नाशकाची 8 ते 10 दिवसाच्या अंतराने प्रतिबंधात्मक फवारणी करावी म्हणजे किड रोगाचा प्रादूर्भाव होण्याआगोदरच त्यास रोखता येते.  किड रोगाचा प्रादूर्भाव दिसल्यानंतर बिव्हिरिया बासियाना,  मेटारायझियम अ‍ॅनासोप्ली., बीसिलस थुरेंजेनिसस, एसएनपीव्ही, एचएनपीव्ही, ट्रायकोडर्मा, सुडोमोनस फ्लोरोसन्स या सारख्या जैविक  किड रोगनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी तसेच आळवणी  करावी. वरील  सर्व एकात्मिक उपाय केल्यानंतर जर किडीरोगाचा  प्रादूर्भाव  आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तरच कमी विषारी सौम्य किटकनाशकाची फवारणी करावी. रासायनिक  किटकनाशकाची  फवारणी केल्यास 20 ते 25 दिवसांनी फळे, भाजीपाला विक्री किंवा खाण्यासाठी  काढावा.

ब)  रासायनिक कीटकनाशक  फवारणी करताना घ्यावयाची  दक्षता -  कीटकनाशक हे 1968 च्या कायद्यानुसार मान्यताप्राप्त परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच घ्यावेत. तसेच केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने (सी.आय.बी.) मान्यता दिलेलेच सिलबंद किटकनाशक  खरेदी करावे. स्थानिक, अमान्यता प्राप्त, मुदतबाह्य, सिलबंद नसलेले, विक्रीस बंदी असलेले, अति स्वस्त किंवा अति महाग किटकनाशक खरेदी करू नये.खरेदी करताना पक्के  बिल  मागून घ्यावे. त्यावर कंपनी, बॅच क्रमांक उत्पादन तसेच अंतिम तारीख नमुद करून घ्यावे. कीटकनाशक खरेदी करताना पॅकिंगवरील आणि लेबल वरील विषाचे प्रमाण दर्शविणारा त्रिकोण पाहून कमी विषारी कीटकनाशक खरेदी  करावे. 

विषाचे प्रमाण दर्शविणारे त्रिकोण पुढीलप्रमाणे असतात.  कमी  विषारी  किटकनाशक-  याच्या पॅकिंगवर हिरवा त्रिकोण  असतो. त्यावर सावधान असे नमुद केलेले असते. साधारण विषारी  कीटकनाशक-  याच्या पॅकिंगवर निळा  त्रिकोण असतो. 

त्यावर धोका असे नमुद  केलेले असते.  जास्त  विषारी  कीटकनाशक-   याच्या पॅकिंगवर पिवळा त्रिकोण असतो. त्यावर विष  असे नमुद  केलेले असते. अति विषारी  कीटकनाशक-   याच्या पॅकिंगवर लाल त्रिकोण असतो. त्यावर विष असे नमुद  केलेले असते शिवाय मानवी कवटी व हाडाचे धोक्याचे चित्र असते. असे  कीटकनाशक शक्यतो खरेदी करू नये. 

घ्यावयाची दक्षता : कीटकनाशक खरेदी करताना लेबल सह खरेदी करावे. लेबलमध्ये घटक, त्याचे प्रमाण, फवारणीचे प्रमाण, विषबाधा झाल्यास करावयाची उपाययोजना, सुरक्षा विषयी सुचना अशी माहिती असते त्या सर्व   सुचनांचे  काटेकोर  पालन करावे.  कीटकनाशकाची  साठवणूक लहान मुलांचा हात पोहचणार नाही, जनावरे चाटणार नाहीत, अन्नपदार्थापासून दूर थंड, कोरड्या  हवेशीर ठिकाणी बंद कुलूपात करावी. कोणते किटकनाशक  कोणत्या कीटकनाशकात अथवा बुरशीनाशकात  मिसळता येते तसेच प्रमाण मात्रा किती असावी याची माहिती तज्ज्ञांकडून घेऊनच  कार्यवाही करावी.  
कीटकनाशक योग्य त्या प्रमाणात घेऊन फवारणी पूर्वी कमीतकमी अर्धा तास प्लास्टिकच्या ड्रम किंवा बादलीत द्रावण तयार करावे व काठीने चांगले ढवळावे. हाताने  मिश्रण कदापी  ढवळू  नये. फवारणी करताना हातमोजे  वापरावेत, पूर्ण अंगभर कपडे घालून त्यावर अ‍ॅप्रन घालावे, डोक्यावर टोपी घालावी, तोंडावर मास्क वापरावा, डोळ्यावर फवारणीचा गॉगल, तसेच  पायात बूट घालावा.  फवारणी सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना किंवा  वार्‍याच्या दिशेने योग्य त्या नोझलच्या सहाय्याने करावी. कडक उन्हात, पावसात, किंवा वार्‍याच्या उलट  दिशेने फवारणी करू नये. आजारी असताना कीटकनाशकाची  फवारणी करू  नये.  फवारणी करताना धुम्रपान, मध्यपान करू नये. तसेच तंबाखू खाऊ नये. फवारणीचा पंप गळका वापरू नये व तोंडाने नोझल साफ करू नये. फवारणी झाल्यानंतर पंप स्वच्छ  धुऊन ठेवावा. पंपाची  देखभाल  वेळेवर  करावी. गंमत म्हणून लहान मुलांच्या हातात  फवारणी पंप  देऊ नये. फवारणी  केल्यानंतर रिकामे डबे नदी पात्रात किंवा इतरत्र फेकून देऊ नयेत.  जमिनीत  खड्डा काढून पुरून टाकावेत.  फवारणी करताना त्वचेवर जर औषध  पडले तर ती  जागा ताबडतोब धुऊन स्वच्छ  करावी.  तसेच कपड्यावर औषध पडल्यास कपडे ताबडतोब  धुऊन घ्यावेत. तसेच कपडे  वापरू नयेत. फवारणी  करताना डोळे चुरचुर करू  लागले तर स्वच्छ  पाण्याने धुऊन काढावेत.