Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Satara › खंडाळ्यात विराट मोर्चा; महामार्गावर रॅली

खंडाळ्यात विराट मोर्चा; महामार्गावर रॅली

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:56PMखंडाळा : वार्ताहर 

मराठा आरक्षण  व विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदला खंडाळकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही  कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरुन रॅली काढून काही  वेळ  ठिय्या मांडला. 

महामार्गापासून पारगांव, खंडाळा मुख्य मार्गावरून मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर सकल मराठा समाजाने धरणे आंदोलनास सुरवात केली. पारगांव येथील भिमाशंकर मंदिरा पासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये शिरवळ येथील तरुणांनी दुचाकी रॅली काढुन सहभाग घेतला होता. तर यावेळी मोर्चामध्ये महिला व भगिनींनी सहभाग दर्शवला होता.

पारगांव व खंडाळा बाजारपेठेतून मोर्चा काढल्यानंतर तहसिल कार्यालया समोर मराठा युवक व लोकप्रतिनिधींनी मनोगते व्यक्त करताना सरकारच्या आरक्षणविरोधी भूमिकेचा निषेध केला. तसेच आंदोलना दरम्यान मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आजपर्यंत मराठा समाजाने संयमाची भूमिका घेत हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी शांततेत मोर्चे काढून आंदोलने केली. मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. आता मराठा समाजाचा संयम संपला आहे. यापुढे  लाठी, काठी, तलवारी घेऊन ठोकमोर्चे निघतील, असा इशाराही देण्यात आला. यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार विवेक जाधव व स.पो.नि हनुमंत गायकवाड यांना लहान मुलांच्या हस्ते देण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळून पारगांव व खंडाळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच इथुन पुढे सातारा जिल्हा मराठा समाज समन्वयक समितीच्या सुचनेनुसार जिल्ह्याच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खंडाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दंगा नियंत्रण  पथक , स्थानिक गुन्हे अण्वेषण विभागाचे जवान, स्थानिक पोलिस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

महामार्गावर वाहनांची तुरळक वाहतूक

मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने खंडाळा पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. परंतु महाराष्ट्र बंद पूर्वनियोजित असल्याने महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहतुक सुरू होती.

मराठा क्रांती मोर्चाकडून महापुरुषांना अभिवादन

मराठा क्रांती मोर्चाकडून मोर्चा सुरु झाल्यानंतर मार्गात असणार्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहिद स्तंभ, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण व छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली

मराठा आरक्षण मागणीसाठी विविध जिल्ह्यात आंदोलना दरम्यान आपल्या प्राणाची बाजी देणार्‍या मराठा हुतात्मा बांधवाना खंडाळा येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.