Sun, Mar 24, 2019 08:42होमपेज › Satara › फुलांसाठी कुंपण मग माणसांसाठी का नको?

फुलांसाठी कुंपण मग माणसांसाठी का नको?

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 10:10PMसातारा : प्रतिनीधी 

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यात वसलेल्या 9 गावांना वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण झाला असून पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या डोंगरकपारीतील जनता भितीच्या छायेत वावरत आहे. कास पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी शासनाने रातोरात संरक्षक कुंपन घातले. मग माणसांच्या संरक्षणासाठी कुंपन नको का? असा सवाल सह्याद्री पठार विभाग विकास संघाने केला असून  कोयना अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पास तातडीने कुंपण घालावे, अशी मागणी केली आहे. 

सह्याद्री पठार विभागाच्यावतीने राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सातारा तालुक्याच्या परळी भागात सह्याद्रीच्या कुशीत 9 गावे वसलेली आहेत. भांबवली, तांबी, धावली, जुंगटी (आलवडी), जळकेवाडी, केळवली, दत्तवाडी, (बांबर), कात्रेवाडी व सांडवली या गावांचा त्यामध्ये समावेश आहे. हा परिसर कोयना अभायारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मोडतो, वन खात्याने, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव सोडलेले आहेत. अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाला कुंपन नसल्याने हे वन्यजीव आमच्या परिसरात वावरताना दिसतात. या परिसरात 15- 16 रान गव्यांचा कळप, बिबट्या, अस्वल, मोर-लांडोर,  डुक्कर इ. वन्य प्राणी राजरोसपणे वावरत असतात. 

दिवसा रानगवे गायरान फस्त करतात तर रात्री शेती तासून खातात. मोर-मांडोर शेतातील पीक वेचून वेचून खातात. बिबट्या व अस्वलाच्या भीतीने एक एकट्याने रानात फिरणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे पशुपालन कमी झाले आहे. वन्यप्राण्यांमुळे शेती व पशुपालन ही उदरनिर्वाहाची साधणे बुडाली आहेत. 

वन्य प्राण्यांनी पाळीव जनावरांबरोबरच माणसांवरदेखील हल्ले केले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे व जनता जीव मुठीत धरुन जगत आहे.  कास पुष्प पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी शासनाने रातोरात संरक्षक कुंपन घातले. प्राण्यांचे व फुलांचे संरक्षण व संवर्धन योग्य असले तरी स्थानिक जनतेचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे नाही का? 

फुलांच्या संरक्षणासाठी कुंपन घातले जाते, मग माणसांच्या संरक्षणासाठी कुंपन नको का? भांबवली ग्रामस्थांनी याबाबत 5 वर्षांपासून जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली असून वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याची मागणी केली आहे, परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.  मात्र, आता कोयना अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाला तातडीने कुंपन घालून लोकांचे संरक्षण करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

जनता का आहे भीतीच्या छायेखाली..?

गेल्या 5 वर्षांत भांबवली, तांबी, जुंगटी, धावली, केळवली, दत्तवाडी व बामणोली गावातील लोकांवर रानगवे, वाघ व अस्वल यांनी हल्ले चढले आहेत. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. भांबवलीत शंकर साळुुंंखे यास एका गव्याने उचलून लांब फेकून दिले, त्यात ते जखमी झाले. धावली येथे द्रौपदाबाई जाधव या महिलेस अस्वलाने गंभीर जखमी केले. जुंगटीत अंकुश कोकरेवर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला.

केळवलीत रात्रीच्या वेळी शेतीची राखण करणार्‍या माणसावर अस्वलाने हल्ला केला. बामणोलीत सईबाई गोरे या गुराखी महिलेवर गव्याने हल्ला करुन जखमी केले. दत्तवाडी येथील एका महिलेला अस्वलाने खाल्ले. तांबी येथील सखुबाई गायकवाड या वृद्धेवर वाघाने घरात घुसून हल्ला केला. त्यात त्या जबर जखमी झाल्या. आजपर्यंत या परिसरातील असंख्य कुत्रे, गुरे, शेळ्या मेंढ्या वन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत, अशी माहिती सह्याद्री पठार विभाग विकास संघाचे रवींद्र मोरे यांनी दिली.