Tue, Jul 16, 2019 22:17होमपेज › Satara › शिवथर येथे विद्युत मोटारी चोरांना ग्रामस्थांनी पकडले

शिवथर येथे विद्युत मोटारी चोरांना ग्रामस्थांनी पकडले

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 11:20PMशिवथर : वार्ताहर

शिवथर (ता. सातारा) येथे  विहिरीवरील विद्युत मोटारी  चोरणार्‍या चोरट्यांना शिवथर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गेले अनेक दिवस मोटारींची चोरी होऊनही चोरटे सापडत नसल्याने शिवथर ग्रामस्थांनी पोलिसांना धारेवर धरले. 10 ते 15 दिवसांपूर्वी शिवथर गावच्या शिवारातील विहिरीवरील विद्युत मोटारी चोरीला गेल्या होत्या, तर काही विहिरींवरील मोटरच्या पाईप कापल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. दोन वर्षांत कॅनॉलवरील, विहिरींवरील, ओढ्यांवरील शिवथर व शिवथर परिसरातील गावांच्या शेतातून शेकडो मोटारी चोरीला गेल्या आहेत.

चोरट्यांनी बोअरमधील मोटारी चोरुन नेल्या आहेत. शेकडो विद्युत मोटारी चोरीस नेवूनही पोलिसांना चोरटे सापडत नव्हते, त्यामुळे शिवथर ग्रामस्थांनी गेली आठ दिवस रात्रगस्त घातली तसेच मोटारी कोण विकत घेत आहेत, त्यांचीही चौकशी केली. चौकशीवेळी रेवडी येथील सत्याप्पा नावाच्या माणसाला चोरटे मोटारी विकत असल्याचे समजले.  त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवथर येथील धनंजय ईश्‍वर साबळे (वय 22), राज हणमंत माने (वय 17), उमेश बाळकृष्ण बोर्डे (वय 18), हणमंत किसन माने (वय 49) यांची नावे सांगितली. या सर्व  चोरट्यांना पकडले असता त्यांनी मोटारी चोरुन विकत असल्याची कबुली दिली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीएसआय शैलेश औटे, एच.सी. मुलाणी, पी.सी. महांगडे, पी.सी. कुंभार, दिपक बर्गे यांनी घटनास्थळी जावून चोरट्यांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी गावातील मोटारी चोरणार्‍या चोरट्यांची नावे वरील चोरट्यांना विचारली तेव्हा चोरट्यांनी योगेश कमलाकर साबळे-पाटील, अविनाश दडस, करन छगन जाधव  त्याचबरोबर सातार्‍यातील तिघे (नावे समजू शकली नाहीत) वाईचा बबल्या, आकाश संदिप साबळे यांची नावे सांगितली. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून तिघेजण तडीपार असूनही त्यांचाही मोटारी चोरण्यात सहभाग असल्याचे चोरट्याने सांगितले.