Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Satara › ऑनलाईनमध्ये गावांचा डेटाच गायब

ऑनलाईनमध्ये गावांचा डेटाच गायब

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 8:40PMसातारा : विशाल गुजर

ऑनलाईन  सातबारा प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एका सर्व्हरवरून दुसर्‍या सर्व्हरवर डेटा ट्रान्सफर करताना जिल्ह्यातील अनेक गावांचा डेटाच गायब झाल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. त्यामुळे या योजनेचे तीन-तेरा वाजले असून शेतकर्‍यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 

सातबारा ऑनलाईन करण्या-साठी मंत्रालयात स्टेट डेटा सेंटर (एसडीसी) हे एकच सर्व्हर उपलब्ध आहे. या सर्व्हरवर लोड येत असल्याने ऑनलाईन सातबार्‍याचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी प्रयत्न करूनही मार्ग निघत नसल्याचे उघड झाले आहे. अखेर हा सर्व डेटा महिन्यापूर्वी नॅशनल डेटा सेंटर (एनडीसी) सर्व्हरवर ट्रान्सफर करण्यात आला आहे. त्यानंतर ऑनलाईन सातबारा पाहता येईल, फेरफारसह सर्व कामे होतील, असे सांगण्यात येत होते. मात्र दोन आठवडे उलटले तरीही जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना सातबारा बघायलाही मिळला नाही. पाऊस समाधानकारक पडला आहे. शेतकर्‍यास जास्त पिकाची अशा आहे. 

त्यासाठी काही शेतकरीवर्ग कर्ज काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मात्र, या सर्व्हरवरून सातबाराच गायब झाल्याने खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळवण्यात शेतकर्‍यांना अडचणी आल्या आहेत.

अखेर तलाठ्यांनी हस्तलिखित सातबारा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र तोपर्यंत शेतकर्‍यांचा बराच वेळ वाया गेलेला आहे. या घोळामुळे पीककर्ज वाटपाची प्रक्रियाही थंडावलेली आहे. आता नॅशनल डेटा सर्व्हरवर सातबार्‍याचा सर्व डेटा ट्रान्सफर केला असून, तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना त्यावर काम करण्यासाठी आवश्यक असणारे डिजिटल सिग्‍नेचर (डीसी) उपलब्ध झालेले नसल्याचे कारण दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक तालुका तहसील कार्यालयासाठी 2-3 डीसी देण्यात आले असून, काम सुरू असल्याचा दावा केला जात आहे. जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकार्‍यांची यादी एनआयसीला पाठवून तीन आठवडे झाले आहेत. अद्यापही त्यांचे पासवर्ड तयार करून पाठवण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात एकूण 1719 गावे असून, यात 546 सजे आणि 98 मंडळे आहेत. तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या नावाने पासवर्ड व डीसी तयार करण्यास किती दिवसांचा वेळ लागू शकतो, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.