Thu, Apr 25, 2019 03:24होमपेज › Satara › प्रितिसंगमावरुन : दखलनीय काका काँग्रेस

प्रितिसंगमावरुन : दखलनीय काका काँग्रेस

Published On: Dec 13 2017 7:23AM | Last Updated: Dec 13 2017 7:23AM

बुकमार्क करा

विलासराव पाटील उंडाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पुर्ण होत असताना याच काळात 1942 साली ब्रिटीशांविरोधात पुकारलेल्या छोडो भारत आदोंलनाला 75 वर्षे होणे, हा फार मोठा योगायोग आहे. या दोन्ही घटनांचा योग साधत विलासराव पाटील आणि संयोजन  समितीने आयोजित  केलेल्या भव्य मेळाव्यामुळे कराड दक्षिणेत काका काँग्रेस गटाला पुन्हा उभारी घेण्याची फार मोठी संधी निर्माण झाली आहे. 

2003 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सभेनंतर अशा प्रकारचा भव्य मेळावा कराडात घेऊन उंडाळकर काकांनी मी काँग्रेसमध्येच असून 79 व्या वर्षीही मी रेसमध्ये  आहे, असा निरोप पक्षश्रेष्ठी आणि विरोधकांना दिला आहे.  सलग 35 वर्षे कराड दक्षिण  मतदारसंघात निवडून येणे आणि पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय राहत सत्तेत टिकून राहण्याचा फार मोठा राजकीय पराक्रम उंडाळकर काकांच्या नावावर आहे. काकांची संपूर्ण राजकीय कारकीर्द चढती राहिली आहे.

रयतेला म्हणजेच सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषद सदस्य झाले, पुढे लोकसभेला उभे राहिले, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले,  पुढे आमदार झाले,  जिल्हा बंँकेचे संचालक, उपाध्यक्ष झाले, पुन्हा आमदार झाले, पुढे मंत्री झाले परंतु काही झाले तरी त्यांनी सर्वसामान्य माणसाची नाळ कधीच सोडली नाही, ते कायम रयतेतच राहिले. प्रत्येक वेळी तिकिट मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. तरी त्यांचे जनमाणसातील स्थान पक्षाला माहित असल्याने पक्ष त्यांना डावलू शकला नाही.  

2014 साली मात्र परिस्थिती वेगळी होती. राज्याची सूत्रे उंडाळकर यांचे परंपरागत राजकीय शत्रू ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका लढवल्या जाणार होत्या. त्यामुळे आठव्या वेळी उंडाळकराना काँग्रेस पक्षाचे  तिकिट मिळाले नाही. दोन प्रमुख पक्षांची ऑफर काकांना होती, प्रलोभनेसुद्धा दाखवली गेली. मात्र ती धुडकावून लावत कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्विकारता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. तिरंगी लढतीत उंडाळकरांनी समोरच्या सर्व बाजूंनी सक्षम उमेदवारांना जोरदार लढत दिली. त्यांचा पराभव  झाला. तरीही समोरच्या व्यक्तीच्या विजयापेक्षा उंडाळकरांच्या पराभवाचीच अधिक चर्चा झाली.  

2014 साली राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आले. काँग्रेस पक्षाचा राज्यात लाजिरवाणा पराभव झाला, पक्षाला नेतृत्वच राहिले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कराड दक्षिणमधील विजयाचा आनंद आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना फार काळ घेता आला नाही. मात्र जनतेतून निवडून मिळालेली आमदारकी, पूर्ण होऊन  दिसायला लागलेली विकासकामे तसेच माजी मुख्यमंत्री म्हणून असणारे वलय यामुळे हा गट सतत चर्चेत राहिला.  दुसरीकडे सत्ताधारी भाजपाचे अतुल भोसले यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवत कामे आणली. नंतरच्या काळात त्यांना पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद सुद्धा मिळाले. आ. पृथ्वीराज चव्हाण आणि सत्ताधारी  अतुल भोसले यांच्या तुलनेत 35 वर्षे सलग आमदारकी असलेले विलासराव उंडाळकर बाजूला फेकले गेल्याचे  वातावरण विधानसभा निवडणुकीनंतर काही महिने होते.  सत्ता नाही, आता काका गट संपला अशी चर्चा विरोधक करू लागले होते. खरं तर पराभवानंतर दुसर्‍याच आठवड्यात उंडाळकरांनी वाडी टू वाडी, गाव टू गाव, घर टू घर अभियान पुन्हा सुरू करत झालेल्या चुकांची दुरूस्ती करून पुढची तयारी सुरू केली होती.  

त्याचाच परिपाक म्हणजे  कराड बाजार समिती, कृष्णा साखर कारखाना आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उंडाळकर गटाने सत्तांतर घडवत मिळविलेले यश होते. काका गटाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. या सर्व राजकीय घडामोडीची दखल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा घेऊन काकांच्यावर अन्याय झाला, अशी भावना व्यक्त केली होती.  जिल्हा परिषद निवडणुकीनंतर  फुल्ल चार्ज झालेल्या उंडाळकर गटाने 2019 डोळ्यासमोर ठेवून विलासराव पाटील यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.  कसलेही सत्कार,  वाढदिवस,  महोत्सव न करणार्‍या काकांनी सुरूवातीला याला नकार दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तयारी दर्शवत याला 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या अमृत महोत्सवाची जोड द्यायची अट घातली. जून - जुलैमध्ये तयारी सुरू झाली आणि 10 डिसेंबरला कार्यक्रम पार पडला.  हा कार्यक्रम म्हणजे काकांच्या गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या इतर सर्व कार्यक्रमाचा अर्क होता. 50 वर्षाचा अनुभव पणाला लावून काकांनी हा कार्यक्रम घडवून आणला. कोणतीही मोठ्ठी सत्ता नसताना, आर्थिक बाजू सक्षम नसताना 15 ते 17 हजार लोक या कार्यक्रमाला कसे जमले? हे न उमगणारे कोडं आहे. आजकाल सभेला माणसं गोळा करताना सत्ता असलेल्या लोकांना आटापिटा करावा लागतो, कारखाने तसेच आमदारकी असलेल्या नेत्यांना माणसे आणण्यासाठी कामगारांना हाताशी धरावे लागते अशी परिस्थिती आहे.  

दुसरीकडे यापैकी काहीच नसताना उंडाळकर काकांच्या कार्यक्रमाला  माणसे जमतात. हाच तर काकांच्या राजकारणाचा, बुद्धिमत्तेचा आणि लोकसंग्रहाच्या अभ्यासाचा विषय आहे. मी थकलेलो नाही, 79 वर्षाचा तरूण आहे, असे सांगत काकांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय विरोधकांना तर आव्हान दिलेच आहे, पण त्याचवेळी कार्यकर्त्यांनी खचून जाऊन नये, नव्या जोमाने कामाला लागावे असा संदेशही देण्यात काका कोठेही मागे राहिलेले नाहीत. त्यांच्या याच जिगरबाज वृत्तीमुळे 2019 ची निवडणूक तुमच्यासाठी सोपी नाही, असा संदेश विरोधकांना देण्यात काका  यशस्वी ठरले आहेत. सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलेले आवेशपूर्ण भाषण कार्यकर्त्यांसाठी केवळ प्रेरणादायीच नव्हते, तर ही कराड दक्षिणच्या किंबहुना सातारा जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची नांदीच होती. त्यामुळे आता कराड दक्षिणसह जिल्ह्यात राजकीय गोळाबेरीज करताना काकांना डावलून चालणार नाही, असा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसला, विरोधकांना मिळाला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल? हे आत्ताच कोणी सांगू शकत नसले, तरी आपण मैदानात असणारच आहोत, आपले आव्हान परतवणे सोपे नसून आपण विजयीही होणार आहोत, असाच सूचक संदेश देण्यात काका यशस्वी झाले आहेत.  त्यामुळेच काकांच्या या सत्कार कार्यक्रमाची नोंद प्रत्येक पक्ष, राजकीय विरोधकांना घ्यावीच लागणार आहे, हे निश्‍चित. 

2003 साली सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत कराडच्या शिवाजी स्टेडियमवर सुमारे 1 लाख लोक जमवून विलासकाकांनी कराड दक्षिणमधील आपली ताकद दाखविली होती. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री म्हणून सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी यासभेनंतर उंडाळकरांची राजकीय उंची दिल्लीदरबारी वाढली होती. सुशिलकुमार शिंदे सध्या सोनिया गांधी किंबहूना राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनाच या कार्यक्रमाला बोलावून उंडाळकरांनी पुन्हा एकदा दिल्लीकरांना आपले लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले. देशभर मोदी विरोधी लाट निर्माण होत असताना याचा फायदा घेण्यात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासहीत काँग्रेसचे पश्‍चिम  महाराष्ट्रातील दिग्गज नेते कमी पडत असताना मी काँग्रेसचाच आहे हे स्पष्ट करून छोडो भारत आंदोलनाप्रमाणे ‘छोडो नरेंद्र- देवेंद्र सरकार’ असा संदेश पोहोचविण्यात उंडाळकर यशस्वी ठरले आहेत आणि हेच या कार्यक्रमाचे यश म्हणावे लागेल. 

- सतीश मोरे

(उद्या ‘काय होऊ शकते दक्षिणेत !)