Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Satara › शासनाकडून शेतकर्‍यांची चेष्टा

शासनाकडून शेतकर्‍यांची चेष्टा

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 13 2018 10:54PMपाटण : प्रतिनिधी

राज्य शासनासह केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. नोटाबंदीसह गॅस दरवाढ, इंधन दरवाढ यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून शहरी भागातील लोकही त्रस्त आहेत. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक करत चेष्टा करण्यात आली आहे. त्यामुळे या शासनाला सत्तेवरून घालवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आदेश माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिले आहेत.

येथील श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकत्याची बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, पक्ष निरीक्षक संभाजीराव गायकवाड, शिक्षण सभापती राजेश पवार, पंचायत समितीच्या सभापती उज्जवला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, शेतकर्‍यांसाठी केवळ घोषणाबाजी आणि जाहिरातबाजी केली जात आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. सरकार फक्‍त उद्योगपतींना पायघड्या घालत आहे. एफडीआयसारख्या थेट परकीय गुंतवणुकीचा आग्रह धरणार्‍या शासनाच्या धोरणामुळे राज्यातीलच नाही, तर देशातील लघु उद्योग उद‍्धवस्त होणार आहेत. शासन सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्य शासनाच्या कर्तृत्वामुळे राज्याच्या माथ्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे राज्यांची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाल्याचेही विक्रमसिंह पाटणकर यांनी यावेळी सांगितले. 

संभाजीराव गायकवाड म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या रूपाने जनसामान्यांविषयी तळमळ असणारे नेतृत्व लाभले आहे. आगामी निवडणुकीमध्ये तालुक्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी परिवर्तन घडवणे आवश्यक आहे. 

उपसभापती राजाभाऊ शेलार, राजाभाऊ काळे यांचेही भाषण झाले. यावेळी तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव जाधव, अर्बन बॅकेचे चेअरमन दिनकराव घाडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, विलासराव क्षीरसागर, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, नगरसेवक नगरसेविका, जिल्हा परिषद,  पंचायत समितीचे आजी - माजी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष पवार यांनी आभार मानले.