Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Satara › विजय दिवस समारोहाची सांगता

मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 17 2017 1:32AM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

तब्बल 1 हजार मुलींचे समूहगीत... मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांचे चित्तथरारक मल्लखांब, लेझीमच्या प्रात्यक्षिकांनी शनिवारी 20 व्या विजय दिवस समारोहास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याचबरोबर या दिमाखदार मुख्य सोहळ्याने हजारो कराडकरांची मने जिंकली. लेफ्टनंट जनरल पी. जे. पन्नू यांनीही या सोहळ्याचे तोंडभरून कौतुक केले.

बांगला मुक्ती संग्रामातील भारतीय सैन्य दलाच्या विजयाप्रीत्यर्थ कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीकडून आयोजित मुख्य सोहळा शनिवारी दुपारी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झाला. लेफ्टनंट जनरल पन्नू यांच्यासह डॉ. शिवाजीराव कदम, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, कर्नल सुहास जतकर, कर्नल आनंद भूषण यांच्यासह कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील हे यावेळी उपस्थित होते.

दुपारी साडेतीनच्या सुमारास सर्वप्रथम कन्याशाळेतील आदर्श विद्यार्थिनींच्या उपस्थितीत स्टेडियमवर विजय ज्योतीचे आगमन झाले. त्यानंतर जवानांसह एसजीएम कॉलेजच्या वुमेन्स मिलिटरी अ‍ॅकॅडमी, विठामाता विद्यालय, पेठ वडगाव येथील पुना इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी तसेच कराड शहर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाचे संचलन झाले. पी. जे. पन्नु यांनी मानवंदना स्विकारल्यानंतर प्रात्यक्षिकांना प्रारंभ झाला.

प्रथम मराठा लाईट इन्फंट्री जवानांनी मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. नायब सुभेदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मल्लखांबच्या आठ प्रकारांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. अ‍ॅरोमोडलिंग आणि पॅराग्लायडींग प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांची वाहवा मिळवली.

लेझीमची प्रात्यक्षिकेही या समारोहाचे प्रमुख आकर्षण ठरले. सर्वात शेवटी पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मासपेटीसह मानवी मनोरे करत समारोहाची उंची वाढवली. त्याचवेळी याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकेही मनमोहक अशीच होती. तत्पूर्वी विठामाता हायस्कूलच्या तब्बल 1 हजार विद्यार्थींनींनी सादर केलेले समूह गीत लक्षवेधी ठरले होते. राष्ट्रगीत होऊन या दिमाखदार समारोहाची सांगता झाली. 

चालकांच्या थरारामुळे सर्वजण अवाक्...

उंब्रजमधील तेजस गायकवाड आणि बबन कुंभार यांच्यासह महेश पाटील यांनी मोटारसायकल तसेच रिक्षाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांमुळे स्टेडियमवर उपस्थित सर्वजण क्षणभर अवाक् झाले होते.