Thu, Aug 22, 2019 12:36होमपेज › Satara › पाटणमध्ये तमाशातही ‘तमाशा’ 

पाटणमध्ये तमाशातही ‘तमाशा’ 

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:41PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ  

पाटणमध्ये रविवारी झालेल्या लोकनाट्य तमाशावेळी प्रेक्षक आणि पोलिस यांच्यात शाब्दिक ‘तमाशा’ पार पडला. यात बेधुंदपणे तमाशात तमाशा करणार्‍या काहींना पोलिस ठाण्यातही नेले आणि यापैकी एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करून पुन्हा सोडूनही देण्यात आले. त्यामुळे पाटणमध्ये पार पडलेल्या या ‘तमाशातील तमाशाच्या’ रंगतदार चर्चा येथे सुरू झाल्या आहेत. 

रविवारी पाटण येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ. मंगला बनसोडे यांचा तमाशा होता. याच तमाशा दरम्यान पाटणमध्ये याच आवारात अनेक तमाशांचा फडही अनुभवायला मिळाला. त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि मग वेगळाच तमाशा झाल्याच्या चर्चा आहेत. तर एका बाजूला तमाशा वेळेत संपविण्यासाठी पोलिसांनी तर जास्तीत जास्त वेळ तमाशा चालावा, यासाठी प्रेक्षकांनी तंबू डोक्यावर घेतला होता.

तमाशा कलावंतांसाठी असे तमाशे नवीन नसले तरी रंगमंचावरून ते एकाच वेळी पोलिस व चाहत्यांनाही शांत बसण्यासाठी’ सोनू.तूला माझ्यावर भरवसा नाय का?’ हे सादरीकरण करून वेळ मारून नेत होते. तर दुसरीकडे एकाचवेळी प्रेक्षक, कलावंत व पोलिस यांच्यातील ही जुगलबंदी पाहता’ तू बघतीस जवा माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतयं ’. या गाण्यानं धिंगाणा घातला. तर दबंग एन्ट्री झाल्यावर’ आला बाबुराव. .’ या गाण्यानं मग अगदी ओठावर मिसरूटही फुटलं नाही अशांचाही झिंगाट धिंगाणा पाहून मग याच बाबूरावांनी लगेचच यांच्यापैकी काही तथाकथित डान्सरना योग्य ती समज दिली, तर काहींनी दारू पिऊन तमाशा करण्याचा प्रयत्न केला अशांना ही या दबंगांनी थेट ठाण्यात नेले. मात्र आत्तापर्यंत रात्रीस खेळ चाले हे ऐकीवात होते. पण इथं तर ‘मध्यरात्रीस खेळ चाले’. जणूकाही असचं घडलं आणि मग संबंधितांविरुद्ध केवळ प्रतीबंधात्मक कारवाई करून पहाटेपूर्वीच ही तमाशा करणारी मंडळी आपापल्या घरी सकाळच्या आंघोळीला पोहोचली याबाबतही सार्वत्रिक आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांची दबंगगिरी आणि कलावंतांची समयसूचकता

हा तमाशा वेळेत संपविण्यासाठी पोलिसांनी आदेश दिले होते. नेमका तमाशा संपविण्याचा वेळी एका बाजूला पोलीस ’ बाराला तमाशा बंद ’ असे सुनावत होते. त्याचवेळी दुसरीकडे ’ तसं झालं तर पैसे परत द्या ’. असा प्रेक्षकांचा तमाशा सुरू होता. मात्र कलावंतांनी दोन्ही बाजूंचा समतोल राखत वेळेत तमाशा संपवला.