Sun, Jul 21, 2019 12:15होमपेज › Satara › वेण्णा लेकवर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

वेण्णा लेकवर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:19PM

बुकमार्क करा

पाचगणी : वार्ताहर

जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्‍वरची ओळख आहे. या ठिकाणी असणार्‍या वेण्णा लेकमध्ये बोटींग करणे प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे बोटींग करतात. मात्र, येथे नौकाविहार करताना लाईफ जॅकेट नसल्याने जीव मुठीत घेऊन बोटींग करावे लागत आहे. त्यामुळे वेण्णा लेकवर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे आहे. येथे एखादी दुर्घटना घडल्यानंतर किंवा एखाद्याचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

महाबळेश्‍वर येथे वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देतात. येथील वेण्णालेक मध्ये नौकाविहार हा पर्यटकांचा आवडता छंद आहे. मात्र, वेण्णालेक येथे बोटींग करताना पर्यटक लाईफ जॅकेट न घालताच पाण्यात उतरतात.त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही साधन दिले जात नसल्याने पर्यटकांना आपला जीव धोक्यात घालून बोटींग करावे लागते. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

वेण्णा लेकचे व्यवस्थापन महाबळेश्‍वर नगरपालिका करते. मात्र, पालिकेकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. वेण्णालेकवर कोठे तरी दोन-चार लाईफ जॅकेट ठेवून शोपीस दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. वेण्णालेकच्या  नौकाविहाराकरता तैनात करण्यात आलेले बोटमन जाग्यावरच नसल्याने त्यांना शोधण्याची वेळ येत आहे. या बोटमनना ओळखपत्र नसल्याने पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर वेण्णालेकवर ठगांची संख्या वाढल्याने नक्‍की अधिकृत कर्मचारी कोण हेच समजत नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. 

बोटमनला स्वतंत्र गणवेश नसल्याने भ्रष्टाचाराला  आमंत्रण मिळत आहे. वेण्णा लेकवर बोटींग करणार्‍या पर्यटकांना लाईफ जॅकेट देणे आवश्यक आहे.याबाबत पोलिसांनीही पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेकरता लाईफ जॅकेट व बोटमनचे कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी पर्यटक व नागरिकांमधून होत आहे.