Mon, Aug 19, 2019 09:49होमपेज › Satara › जिल्ह्यात ऊस वाहतूक करणार्‍या  64 बैलगाडी चालकांवर कारवाई 

जिल्ह्यात ऊस वाहतूक करणार्‍या  64 बैलगाडी चालकांवर कारवाई 

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 24 2018 11:31PMवेणेगाव : वार्ताहर 

बैलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात ऊस वाहतूक करणार्‍या 64 बैलगाडी चालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या कारवाईमुळे प्राणीप्रेमी तसेच सर्वच स्तरातून या पथकाचे कौतुक होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे - पाटील यांच्या पथकाने दिनांक 20  मार्च पासून ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडी चालकांवर कारवाया करण्याचा धडाका लावला होता. जिल्ह्यात ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. या वाहतुकीदरम्यान बैलांना मारणे, कानाजवळ फिरकी लावणे, अती वजन घालणे, विश्रांती न देणे, उन्हात काम करून घेणे अशा पध्दतीने बैलांच्यावर अत्याचार होताना दिसत आहेत.

यासाठी विश्‍वास नांगरे - पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 20 ते 27 मार्च अखेर जनजागृती सप्ताहात दहा जणांचे पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने जिल्ह्यातील कारखाना परिसरात कोरेगाव तालुक्यात 16 कारवाई, बोरगाव (ता.सातारा) येथे 7 कारवाई, कराड 17, भुईंज येथे 24 बैलगाडी चालकांवर कारवाया केल्या. या पथकाने कारवाई दरम्यान जनावरांना पाणी पाजणे, वेसन काढून मुर्खी घालणे, बैलांना विश्रांती देण्यासाठी प्रयत्न करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केलेे. या 64 बैलगाडी चालकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अशाच पद्धतीची कारवाई यापुढेही  सुरु राहणार असल्याचे या पथकाकडून सांगण्यात आले. 
 

 

 

tags : Venegaon,news, action,sugarcane, drivers,district,