Sun, Apr 21, 2019 02:31होमपेज › Satara › सुसाट वाहनधारकांची पोलिसांच्या हातावर ‘तुरी’

सुसाट वाहनधारकांची पोलिसांच्या हातावर ‘तुरी’

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:13PMसातारा : विशाल गुजर

सातार्‍यात सध्या वाहनधारक पोलिसांना अगदी सहजपणे चकवत वाहतुकीचे नियम मोडत आहेत. चौकात पोलिस दिसला तरी त्याच्या हातावर तुरी देत सुसाट वाहन दामटत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळेच शिस्त मोडणार्‍या वाहनधारकांना आता ‘सिंघम’ नीती अवलंबणे गरजेचे आहे.

सातारा शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती व्हावी, यासाठी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास काही वेळ वाहतूक पोलिसांचे दर्शन पहायला मिळते. नियम मोडणार्‍यांना पोलिस समजावून सांगत दंडही वसूल करत असतात. मात्र, अलिकडे सातारा शहरात पोलिसांना चकवण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील वाहनधारकांना कोणत्या चौकात वाहतूक पोलिस उभा असतो याची अप टू डेट माहिती असते. त्यामुळे   बोळाबोळातून वाहने घुसवण्याचे प्रकार सध्या जोरात चालू आहेत. तसेच काही वाहनधारक तर चौकात समोर पोलिस दिसला तर बिनधास्तपणे वाहने वळवण्याचे प्रकार करतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वेळेला एखाद्या वाहनधारकावर पोलिस कारवाई करत असताना त्याची नजर चुकवून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकारही पहायला मिळत आहेत. 

वाहतुकीचे नियम मोडण्याच्या प्रकारात तरुण व लहान मुले आघाडीवर आहेत. त्यामुळे पालकांनी देखील त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज आहे. कारण हौसेपोटी धोकादायक  वाहतूक करणे पाल्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता  नाकारता येत नाही. 

अलिकडे एखाद्या पोलिसाने वाहनधारकाला नियम मोडताना पकडले तर त्यांच्याशी हुज्जत घालण्याचेही प्रकार काही वाहनधारक करत आहेत. त्यामुळे पोलिस अक्षरश:  वैतागून जात आहेत.  वाहनधारकांच्या बेफिकीरीमुळे सध्या शहरात अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. वाहतूक पोलिस शाखेने याची दखल घेऊन नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काही खबरदारीचे उपाय
 

वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे.

मुलांना लायसन्स परवाना असल्याशिवाय शाळा - महाविद्यालयांना ण्यासाठी वाहन देऊ नये.  

वाहनधारकांनी वाहन चालवताना वेगाची मर्यादा पाळावी.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे.

वाहतुकीचे नियम पाळताना स्वयंशिस्त अधिक महत्त्वाची