Fri, Apr 19, 2019 08:17होमपेज › Satara › दोन दगडी अन् रिबनवर वाहनांचे नियंत्रण

दोन दगडी अन् रिबनवर वाहनांचे नियंत्रण

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 10:09PMपरळी : वार्ताहर 

निसर्गरम्य ठोसेघर धबधबा, चाळकेवाडी विस्तीर्ण पवनचक्क्यांचे पठार, समर्थ रामदासस्वामींच्या दर्शन घेण्यासाठी ज्या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये - जा करत असतात. त्या रस्त्याला गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती केली नाहीच पण दोन दगडी अन् प्लास्टिकची  रिबन लावून बांधकाम विभागाने नामी शक्कल लढवत मार्ग सुरुच ठेवला  आहे. 

ज्या मार्गावरून पवनचक्क्यांची अवजड वाहने ही जातात असा मार्ग म्हणजे हा रस्ता आहे. गजवडी फाट्यावरून पुढे आल्यावर सज्जनगडच्या दिशेने असलेल्या तीव्र वळणावर अन तीव्र चढावर एक ठिकाणी रस्त्याला चांगलेच भगदाड पडले आहे. हे भगदाड दोन वर्षांपूर्वी लहान स्वरूपात होते आता त्या भगदाडाखालचा भराव ढासळल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. 

भगदाड वळणावरच असल्याने एकावेळी दोन गाड्या आल्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरूनच दररोज सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी, आंबळे, कारी, राजपुरी, रेवंडे, पांगारे अशा गावांमधून हजारो वाहने जात असतात. या पडलेल्या भगदाडाच्या आणखी काही अंतरावरच अशा प्रकारे रस्ता खचला आहे. वरुन रस्ता दिसत असला तरी आतून भराव ढासळत आहे. बांधकाम विभागाने एखाद्या अपघाताची वाट न पाहता तत्काळ या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकामधून होत आहे.