Wed, Jul 17, 2019 20:35होमपेज › Satara › लुंग्या-सुंग्यानी वसना योजनेचे श्रेय घेऊ नये :  रामराजे ना. निंबाळकर

लुंग्या-सुंग्यानी वसना योजनेचे श्रेय घेऊ नये :  रामराजे ना. निंबाळकर

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 23 2018 11:47PMफलटण : प्रतिनिधी 

वसना उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी आघाडी सरकारच्या काळापासून आजपर्यंत पाठपुरावा केला  आहे. त्यामुळेच योजना पूर्णत्वास जात असून या योजनेच्या कामाचे श्रेय कुणी लुंग्या-सुंग्यानी घेऊ नये.सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यात व राज्यात पुन्हा राष्ट्रवादीची गरज आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.  

सोनके ता.कोरेगाव येथे वसना उपसा सिंचन योजनेच्या पाणी पूजन कार्यक्रमानंतर चौधरवाडी ता. कोरेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व नूतन पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर,  सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

केवळ निवडणुकीपुरता धुरळा उडवणार्‍या लोकांना बळ देऊ नका. शहरीकरणासाठी हजारो कोटींचा निधी देणारे हे सरकार शेतकर्‍यांच्या तोंडाला मात्र पाने पुसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत या सरकारबद्दल प्रचंड राग आहे. गेल्या साडेतीन वर्षात आपल्या भागात  सरकारच्या माध्यमातून काय काम झाले का? याचा विचार करा,  औद्योगिक, बेरोजगारी व शेतीचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीला ताकद द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

गावपातळीच्या स्थानिक राजकारणात आम्ही लक्ष घालत नाही. उलट वाद वाढविण्यापेक्षाही ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. फलटणकरांनी आजपर्यंत कोणताही भांडणे लावण्याचा उद्योग केला नाही. पण माझ्या वाट्याला कोण गेले तर मात्र मी सोडत नाही. वसना योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, उत्तर कोरेगावात लबाड लोकांचे पीक आले असून आमच्यामुळे पाणी आले अशी कोल्हेकुई सुरू आहे. पण आपलं वय काय? आपली ताकत काय? याचं भान या महाभागांना नसल्याचा टोला ना. रामराजे यांनी लगावला.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले,  वसना योजनेची मुहूर्तमेढ खा. शरद पवार यांच्या हस्ते रोवली. ना. रामराजेच्या पाठपुराव्यातून ही योजना पूर्णत्वास जात आहे. दरम्यान, सेना-भाजपचे सरकार बाजूला करण्यासाठी गावातील मतभेद बाजूला ठेऊन राष्ट्रवादी हाच गट समजून एकत्र येवूया. आता हे सरकार खाली खेचण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा काढली जाणार आहे.

यावेळी आ. मकरंद पाटील,  आ.शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब सोळसकर, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. 

प्रारंभी गावातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन केल्यानंतर नूतन  जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.तानाजीराव शिंदे यांनी प्रस्ताविक केले. बाळासाहेब भोईटे यांनी आभार मानले. यावेळी राजाभाऊ जगदाळे, मंगेश धुमाळ, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, संजय साळुंखे,  प्रताप कुमुकले, ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्यावरही कृपाद‍ृष्टी ठेवा : आ. शिंदे

आज जिल्ह्याला निधी मिळत नसल्याने विकास कामे रखडली असून सर्व पश्‍चिम महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जात आहे. मात्र, फलटणला भरीव निधी मिळत आहे. मोदी लाटेत आमची सत्ता गेली. मात्र, रामराजेंना दिवा मिळाला. ते केवळ फलटणचे नव्हे तर जिल्ह्याचे नेते आहेत. आम्ही सर्व आमदार निधीच्या बाबतीत उपाशी असल्यामुळे  त्यांनी आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी, असेही आ. शिंदे म्हणाले.