Sat, Jun 06, 2020 01:26होमपेज › Satara › जावली परिसर रानफुलांनी बहरला

जावली परिसर रानफुलांनी बहरला

Published On: Oct 04 2018 1:45AM | Last Updated: Oct 03 2018 10:39PMकुडाळ:  प्रतिनिधी 

जावली तालुक्यातील सायघर पठार पिवळ्या रान फुलांनी बहरले आहे. तालुक्यात सर्वत्र रंगीबेरंगी रान फुलांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. 

महाबळेश्‍वर व जावली तालुक्यात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पाऊस संपताच या परिसरात  निसर्गाची मुक्त उधळण पहावयास मिळते. तालुक्यातील बहुतांशी डोंगररांगांवर विविध रान फुलं उमलू लागली आहेत. केवळ कास पठारावर नव्हे तर जावली तालुक्यातील अनेक डोंगररांगांवर विविध रान फुलांची उधळण दिसून येत आहे. विशेषतः कास पठारावर विविध रंगांची फुले दिसून येतात. 

मात्र, येथील डोंगररांगा रंगी बेरंगी फुलांनी सजल्या आहेत. महाबळेश्‍वर-पाचगणी वरुन भिलार मार्गे मेढ्याकडे येणारा रस्ता चारी बाजूंनी फुलांनी बहरून गेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या फुलांचा सडा पडला आहे. हिरव्यागार गवतावर पिवळी  फुले वार्‍याच्या तालावर डुलत आहेत. जावली तालुक्यातील  सायघर, मारली, हातगेघर, मुरा या पठारावर  हा निसर्गरम्य नजारा पहावयास मिळतो.

तालुक्याला निसर्गाने दिलेले वरदान  काही औरच  आहे. पंढरपूर-महाबळेश्‍वर-महाड या मार्गावरील भणंग, वाघेश्‍वर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द हिरवळीवर पिवळी, नारंगी, गुलाबी  फुले बहरलेली दिसतात. ही फुले महाबळेश्‍वरला जाणार्‍या पर्यटकांना भुरळ घालत आहेत. कण्हेर धरणाचा जलाशय व येथील निसर्गाचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या परिसराला भेट देत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा बहरलेली फुले पाहण्यासाठी पर्यटक येथे थांबत आहेत. ते या रंगीबेरंगी फुलांसमवेत आपली सेल्फी घेत असल्याचे चित्र पहावयास मिळते.  कास पठारावरील विविध रंगी जैवविविधता पाहण्यासाठी मुंबई, पुणे, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणांवरुन पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. ते आनेवाडी, मोरखिंडीतून मेरुलींग येथील पाच पांडवांनी बांधलेल्या शिव शंकर मंदिराचा पुरातन परिसर पाहून भणंग परिसरातील विविध नागमोडी वळणे घेत मेढा, मोहट पुलावरुन पर्यटक पुढे जातात. कुसुंबी एकीवचा धबधबा पाहून कास परिसरातील जागतिक दर्जा लाभलेल्या कास पुष्प पठारला पर्यटक भेट देतात.