Sun, Jul 21, 2019 08:24होमपेज › Satara › महाबळेश्‍वरातील भिंती बोलू लागल्या

महाबळेश्‍वरातील भिंती बोलू लागल्या

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 9:54PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत शहरामध्ये पालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध पॉईंटच्या भागात असणार्‍या भिंतींची पालिकेच्यावतीने रंगरंगोटी करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे काळवंडलेल्या या भिंतीवर रंगाचा सडा पडल्याने भिंती आता बोलू लागल्याचा अनुभव पर्यटकांना येत आहे. 

स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत अव्वल येण्यासाठी पालिकेने महामॅरेथॉन स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध संघटना व संस्थांनी सहभाग नोंदवून आपल्या परिने शहराची स्वच्छता केली. तर नगरसेवकांनीही घर टू घर जाऊन याबाबत जनजागृती केली आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा केला जात आहे. ज्यांच्याकडून नियमांचा भंग केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. 

नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार व नगरसेवकांनी झटून काम केल्याने काहीच दिवसांमध्ये शहराचा कायापालट झाला आहे. यापूर्वी पालिकेने बसस्थानक व इतर ठिकाणे रंगवली होती. तोच कित्ता गिरवत अनेक वर्षांपासून ज्या भिंती काळवंडल्या होत्या त्याची रंगरंगोटी केली आहे. त्यामुळे शहरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. या भिंतीवर स्वच्छता संदेश चितारून जनजागृती करण्यात येत आहे. आए हो देखणे शहर हमारा दूर ही रखना कचरा तुम्हारा, एक कदम स्वच्छता की ओर अशा आशयाचे  संदेश लिहिण्यात आले आहेत. शहरामध्ये प्रवेश करताना नजरेस पडणार्‍या भिंतींवर शहरातील सर्व पॉईंट, पुरातन कृष्णा माई मंदिर, किल्‍ले प्रतापगड, लिंगमळा धबधब्याची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. पर्यटक या चित्रांसोबत सेल्फी घेताना पाहावयास मिळत आहेत. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या भिंती आता या चित्रांमुळे स्वच्छता संदेशांमुळे खर्‍या अर्थाने बोलू लागल्या असून महाबळेश्‍वरकरांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण आहे.