Wed, Apr 24, 2019 16:24होमपेज › Satara › वारी ते मराठा आंदोलन ऑन ड्युटी चोवीस तास

वारी ते मराठा आंदोलन ऑन ड्युटी चोवीस तास

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 10:47PMकराड : अमोल चव्हाण

पालखी सोहळा जिल्ह्यात आल्यापासून बंदोबस्तावर गेलेले पोलिस त्यानंतर दूध आंदोलन व आता मराठ्यांच्या आंदोलनामुळे 24 तास ड्युटीवर आहेत. कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह शहर व तालुक्यातील पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी गेली दहा ते बारा दिवसांपासून बंदोबस्तावर आहेत. सामाजिक शांततेसाठी रात्रंदिवस ते खडा पहारा देत आहेत. शक्य असेल तेथे थांबायचे व मिळेल ते खायचे असा त्यांचा दिनक्रम सुरु असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न कोठेही निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

संत ज्ञानेश्‍वर माऊली व जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान पोलिसांना ऑन ड्युटी चोवीस तास बंदोबस्त देऊन वारकर्‍यांची सेवा करावी लागते. मात्र, पोलिस ही सेवा दरवर्षी आनंदाने करत असतात. काही पोलिस तर दरवर्षी वारकर्‍यांची सेवा करायला मिळावी म्हणून पांडुरंगाला साकडे घालतात. यावर्षीही पालखी सोहळा जिल्ह्यात येण्यापुर्वीच कराड शहर व तालुक्यातील बहुतांशी पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर पाठविले होते. सुमारे चार दिवस माऊलींची पालखी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी असताना पोलिसांनी आनंदाने वारकर्‍यांची सेवा केली. याच दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दर वाढीसाठी आंदोलन सुरु झाले. जिल्ह्यात आंदोलनाची तिव्रता वाढत असल्याने प्रशासनाने वारीच्या बंदोबस्तावर असलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना वारीचा बंदोबस्त संपल्यानंतर त्वरीत कराडमध्ये ड्युटीवर हजर राहून बंदोबस्तावर जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे रात्री उशीरा तसेच पहाटे वारीतून आलेले पोलिस दुसर्‍याच दिवशी सकाळी नऊ वाजता पोलिस ठाण्यात हजर झाले.  

त्यानंतर दोन दिवस सुरु राहिलेले दूध दराचे आंदोलन कराडसह तालुक्यात काही किरकोळ प्रकार वगळता अतिशय शांततेत पार पडले. याचे सर्व श्रेय पोलिसांनाच द्यावे लागेल. जर पोलिसांनी बंदोबस्तामध्ये हयगय केली असती तर केंव्हाही आंदोलनाचा भडका उडाला असता. दूध दराचे आंदोलन मिटल्याचा संदेश आला असतानाच दुसरीकडे परळी येथे मराठ्यांच्या आंदोलनाची ठिणगी पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पुजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने मराठा आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागली. दूध दराच्या आंदोलनातून उसंत मिळण्यापुर्वीच मराठ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना ड्युटीवर राहून चोवीस तास खडा पहारा देण्याच्या सुचना मिळाल्या. त्यामुळे पुन्हा पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचारी ड्युटीवर हजर झाले. गेली चार दिवसांपासून हे आंदोलन ऐवढे चिघळले आहे की केंव्हा, कोठे त्याचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रयत्न करत असून आंदोलनाची धग अद्यापही कायम असल्याने अजून किती दिवस त्यांना रात्रंदिवस बंदोबस्तावर रहावे लागणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. 

कराडच्या पोलिस निरीक्षकांकडून पांडुरंगाची सेवा...

पालखी सोहळा जिल्ह्यात येत असताना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठविले जातात. मात्र, कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आजपर्यंत कधीच पोलिस ठाणे सोडत नव्हते. मात्र, मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर  1993 नंतर प्रथमच कराड शहर पोसिल ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी जावे लागले. पंढरपूरमध्ये आंदोलन झाले नसले तरी कराडमध्ये मात्र, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे वार वाहू लागले. त्यामुळे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड हे पंढरपूरमधून थेट मराठ्यांचा ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन स्थळावर दाखल झाले. आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी दिवसभर खडा पहारा दिला. 

तालुका पोलिस निरीक्षकांचे दिवसभर भिरकीट..

पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी तालुका पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अनुभवानुसार अतिशय सुक्ष्म नियोजन भर दिला. दूध दर आंदोलनाबरोबर मराठा आंदोलनांच्या कालावधीत तालुक्यात शांतता रहावी म्हणून स्वत: फिल्डवर रहाणे त्यांनी पसंत केले. या कालावधीत त्यांना तालुक्यातील पोलिस पाटलांचे चांगले सहकार्य मिळाले. त्यामुळे एखादी घटना घडण्यापुर्वीचे त्याचे मेसेज पोलिसांना मिळत होता. बुधवारी झालेल्या मराठा आंदोलनावेळी तर पीआय अशोक क्षीरसागर यांनी दिवसभर भिरकीट लावून एका दिवसात सकाळी 6 वाजल्यापासून तालुक्यात विविध ठिकाणी भेट देत सुमारे 386 किलोमिटरचा प्रवास केला. त्यामुळेच जिल्हा पेटला असताना कराड तालुक्यात आंदोलनाची तेवढी धग जाणवली नाही.