Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Satara › पंढरीची वारी आहे माझ्या घरी..!

पंढरीची वारी आहे माझ्या घरी..!

Published On: Jul 13 2018 12:52AM | Last Updated: Jul 12 2018 8:48PMसातारा : प्रवीण शिंगटे 

पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत..
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍यांचे एक व्रत असते. या वारीमध्ये अनेक जातीधर्माचे लोक सहभागी होतात. संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा पालखी  सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनांचे वैभव आहे. 

वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हा भागवत भक्तीचा अविष्कार असून भावभक्तीचा एक अनुभव आहे. भगवी पताका खांद्यावर घेऊन ऊनपावसाची तमा न बाळगता गेली शेकडो वर्षे महाराष्ट्र वारीत चालतो आहे. शेतकरी, कष्टकरी असलेला हा समाज एका श्रद्धेने पंढरीची वारी करतो आहे. कंपाळी उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठलाचे नाम हे वारकरी समाजाचे द्योतक आहे. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगत्तगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या देहू आळंदीतून पंढरपूरकडे निघतात आणि लाखो वारकरी या सोबत चालतात. या मातीत जन्मलेले राजा छत्रपती शिवराय ते राजर्षि शाहू महाराज यांनी संतांच्या शिकवणीचे पालन केले आहे. संत वैष्णव धर्माची मांडणी करतात जो समानतेवर आधारीत आहे. संताना भेद पसंद नाही. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, जातीची उच्च निचता हे संतांना मान्य नाही.

संत तुकाराम महाराज म्हणतात  
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, 
भेदाभेद भ्रम अमंगळ 

जग हे एका पावन शक्तीने भरलेले आहे. इथे भेदाभेद करणे अमंगळ आहे. हेच वारीचे सुत्र आहे.संत ज्ञानेश्वरांनीही पसायदानात भगवंताकडे खळांचे खळपण नष्ट व्हावे, अशी उदात्त मागणी केली आहे. पंढरपूरची वारी म्हणजे शिस्त आहे, लोकांनी लोकांना लावलेली. संतांची शिकवण अंगी उतरावी म्हणून केलेली तपश्चर्या आहे. वारीचे तीन आठवडे माणूस चालतो असा रस्ता जो त्याला समानतेकडे, भक्तीकडे, संवेदनशीलतेकडे आणि निसर्गाकडे घेऊन जातो. वारीच्या रस्त्यावर तो मातीत झोपतो, तो उन्हात चालतो, तो झाडाखाली बसतो, तो पावसात भिजतो, तो निसर्गातील प्रत्येक कणाशी एकरुप होतो. 

संत तुकाराम महाराज म्हणतात, 
अणुरेणूहुनी थोकडा, तुका आकाशाएवढा.. हा अनुभव घेण्यासाठी संतांची ही वारी परंपरा इथल्या मातीला वारकर्‍याला समृद्ध करते. वारी म्हणजे सामाजिक एकात्मता, जनजागृतीचे उत्कृष्ट माध्यम समजले जात आहे. त्यामुळेच ही वारी आता देशासह सातासमुद्रापलिकडे पोहोचली असून  या वारीत परदेशी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होवून वारीचा आनंद लुटतात.