Sun, Jul 21, 2019 16:49
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वारी पंढरीची 

वारी पंढरीची 

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 8:03PMमहाराष्ट्र ही संतांची भूमी. या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्‍ताबाई, या चार भावंडांसोबतच, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, संत जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार यांसारख्या संतांची मांदियाळी निर्माण झाली. सुमारे 700 वर्षांपूर्वी संतांनी भागवत धर्माचा पाया रचला आणि विठ्ठल भक्‍तीचे महात्म्य सामान्यांपर्यंत पोहचवून वारकरी संप्रदायाची रचना केली. ज्ञानेश्‍वरांनी स्थापिलेल्या या संप्रदायाचे स्वरूप धार्मिक असले तरी ते मानवतेवर आधारित होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना वेद पुराणांचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकार आहे, हा संदेश त्यांनी दिला आणि म्हणूनच सर्व धर्मीयांना विठ्ठल आपला वाटू लागला.

वारकरी  सांप्रदायाच्या  माध्यमातून समाजप्रबोधनासाठी मग वारीची संकल्पना पुढे आली. वारीचे अथवा दिंडीचे आजचे स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येते हा पाया रचण्यासाठी अनेक संतश्रेष्ठांना आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागली. त्यांनी निर्माण केलेल्या अभंग, निरूपणे, रचना यांच्या माध्यमातूनच वारकरी घडत जाऊन पंढरीची वारी वर्षागणिक भक्‍तीरसात न्हावून जात आहे. पावसाळा सुरु झाला की वेध लागतात ते माऊलींच्या याच पालखी सोहळ्याचे. ही वारी म्हणजे  वारकर्‍यांचे व्रत बनले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव बनला. ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. आषाढी-कार्तिकीला ‘पंढरपुरा नेईन गुढी’ म्हणत सर्व महाराष्ट्रातून दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. अनंत अडचणी आल्या तरी नदी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते. अगदी तशीच ही विठ्ठल भक्‍तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्‍या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते, ती या वारकरी सोहळ्याच्या रूपात. 

वारी  हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टाहासाने जोडलेला सदगुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्‍तीचा नुसता आविष्कार असून मुक्‍तीतील आत्मनंदाचा आणि भक्‍तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्‍काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. ही वारी म्हणजे एका अर्थी  संत साहित्य संमेलनेच. ठिकठिकाणी चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्‍यांची कीर्तने होतात. टाळमृदुंगाचा गजर होतो. 

एखादी सहल काढायची किंवा घरात एखादा छोटा कार्यक्रम आयोजित करायचा म्हटलं तर किती तयारी, विचार करावा लागतो. कार्यक्रम पार पडेपर्यंत कर्त्या माणसाला केवढा घोर लागून राहतो. पण ही वारी म्हणजे एक आश्‍चर्यच नव्हे का? वारी ठराविक तिथीला निघते, आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही, वर्गणी नाही, सक्‍ती नाही, पण विणेकर्‍याच्या भोवती दिंडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, भाविक किती,  सगळं काही ठरवल्यासारखं. विठूनामाचा गजर करत सारे एका लयीत नाचत पांढरीकडे जात असतात. यात कोणालाही त्याची जात विचारली जात नाही, कोणालाही त्याचे कूळ विचारले जात नाही. दिंडीत फक्‍त माणूस श्रेष्ठ मानला जातो. माणसातील देवपण ज्याला उमगले, त्यालाच वारीचा, वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ उमगला.  लाखोंच्या संख्येने वारकरी सारे भेदभाव विसरत एकत्र येतात, एकत्रीकरणातून आपला धार्मिक आनंद साजरा करतात. सावळ्या विठ्ठलाला आपल्या मनामनांत साठवतात आणि प्रत्येक वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच संभवतोे. प्रत्येक वारकर्‍यातून जणू संतांचीच अनुभूती येते. म्हणूनच पंढरीच्या या वारीने भक्‍तीचा महिमा आणखी गडद करून ठेवला आहे.