Thu, Jun 27, 2019 16:07होमपेज › Satara › सचिव जी. डी. पाटील यांनीच 15 कोटी खोलीत ठेवले

सचिव जी. डी. पाटील यांनीच 15 कोटी खोलीत ठेवले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वारणानगर : प्रतिनिधी

वारणा शिक्षण मंडळाच्या विश्‍वस्तांना अंधारात ठेवून पालकांकडून डोनेशन स्वरूपात घेतलेली बेहिशेबी रक्‍कम संस्थेचे सचिव जी. डी. पाटील यांनीच वारणा शिक्षण मंडळाच्या कॉलनीतील ‘त्या’ खोलीत ठेवली होती. तीच 15 कोटी रुपयांची रक्‍कम चोरीला गेली आहे. या रकमेची मालकी सांगून फिर्याद देणारे कोल्हापूरचे झुंझारराव सरनोबत यांची ही रक्‍कम असल्याची तीळमात्रही शक्यता नाही. त्यामुळे या रकमेबरोबरच सचिवांच्या मालमत्तांची, बँक खात्यांची सीआयडीमार्फत चौकशी करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्‍ते विजयसिंह जाधव यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले.

सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाधव यांनी ही माहिती दिली. वारणानगर येथे दोन वर्षांपूर्वी शिक्षक कॉलनीत कोट्यवधी रुपयांची चोरी झाली होती. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्‍या या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले  आहे.  ‘त्या’ खोलीत जी. डी. पाटीलयांचे येणे-जाणे याबाबत विजयसिंह जाधव म्हणाले, वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांच्या ताब्यात असलेल्या खोलीत संस्थेचे जुने रेकॉर्ड ठेवण्यात येत होते. याच खोलीत सचिवांनी इंजिनिअरिंग, फार्मसी, बी.एड., डी.एड. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून डोनेशन स्वरूपात घेतलेली बेहिशेबी रक्‍कम ठेवली होती. या खोलीत पाटील यांचे येणे-जाणे होते.

याचदरम्यान त्यांच्याकडे काही काळ चालक म्हणून काम करणार्‍या मैनुद्दिन मुल्ला (रा. जाखले) यास या रकमेची माहिती असल्याने त्याने 8 मार्च 2016 ला कोट्यवधी रकमेवर डल्ला मारला. सरनोबत यांचा रकमेशी कसलाही संबंध नाही ही घटना उघडकीस आल्यानंतर पाटील यांचे नातेवाईक झुंझारराव सरनोबत (कोल्हापूर) यांचा काहीही संबंध नसताना कोडोली पोलिस ठाण्यात ही रक्‍कम माझीच असल्याचे सरनोबत यांनी सांगितले. त्यानंतर या चोरीच्या रकमेवर तपास अधिकार्‍यांनीच 9 कोटी 30 लाख रुपयांचा डल्ला मारल्याचे उघडकीस आले. यानंतर त्या खोलीतील पंचनाम्यात   

1 कोटी 27 लाख रुपये सापडले होते. फिर्यादी सरनोबत यांनी वारंवार फिर्यादीतील रकमेचा आकडा सोयीने बदलला. त्यामुळे ही रक्‍कम सरनोबत यांची नाही, हे स्पष्ट होते. पोलिसांचे दुर्लक्ष
मात्र, याकडे जाणीवपूर्वक पोलिसांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप जाधव यांनी करून पोलिसांनी या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांकडे चौकशी केली असती, तर या खोलीकडे सरनोबत कधीच फिरकले नव्हते, हे स्पष्ट झाले असते. पोलिस पंचनाम्यावेळी त्या खोलीची व कपाटाची किल्लीही सरनोबत यांच्याकडे नव्हती. त्यामुळे कुलपे तोडून पंचनामा केल्याचे चित्रीकरण पोलिस रेकॉर्डवर आहे, तर सचिवांची या ठिकाणी मात्र सतत ये-जा असल्याने ही रक्‍कम नेमकी कोणाची, हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही, असाही आरोप त्यांनी केला.

कोरे कुटुंबीयांनी  जी. डी. पाटील यांच्यावर मोठ्या विश्‍वासाने शिक्षण संस्थेची जबाबदारी सोपवली होती. मात्र, पाटील यांनी कोरे कुटुंबीयांचा विश्‍वासघात केला, असाही आरोप जाधव यांनी केला.
पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सचिव जी. डी. पाटील हे कोलोली (ता. पन्हाळा) येथील रहिवाशी असून 25 वर्षांपूर्वी वारणा बझारमध्ये सेल्समन म्हणून नोकरीस होते. त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती सामान्य होती.

सध्या मात्र वारणानगर येथे बंगला, अमृतनगर येथे जागा, बहिरेवाडी येथे पत्नीच्या नावे अपार्टमेंट, तळसंदे (ता. हातकणंगले) येथील जमीन, कागल येथील पंचतारांकित वसाहतीत उभारत असलेला औषधांचा कारखाना, कोल्हापूर येथे असलेला बंगला व फ्लॅट, पुणे येथे असलेला फ्लॅट, सांगली जिल्ह्यातील येळावी येथील जमीन या सर्व स्थावर मिळकती कोट्यवधी रुपयांच्या असून ही सर्व बेहिशेबी मालमत्ता वारणा शिक्षण मंडळाचे संस्थाचालक यांना अंधारात ठेवून संस्थेची फसवणूक करून त्यांनी मिळविली आहे.

तसेच तपास करणार्‍या पोलिसांनी सरनोबत आपल्या चोरीचा रकमेचा आकडा वारंवार बदलत आहे, ही शक्यता विचारात घेऊन तपास करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी त्या पद्धतीने तपास केलाच नाही. त्यामुळे या रकमेचा नेमका मालक कोण, हे शोधून बेहिशेबी 15 कोटी रकमेबरोबरच पाटील यांनी 20 वर्षांत खरेदी केलेली मालमत्ता व बँक खात्यांची सीआयडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती विजयसिंह जाधव यांनी दिली.
 

 

 

 

tags : Varananagar,news,unaccounted, amount,donation,parents, Varna, education, board,


  •