Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Satara › वाजपेयींनीच आणले होते तर्कतीर्थांना जनसंघाच्या व्यासपीठावर

वाजपेयींनीच आणले होते तर्कतीर्थांना जनसंघाच्या व्यासपीठावर

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:36AMसातारा : हरीष पाटणे 

‘बाधाएँ आती है आएँ 
घिरे प्रलय की ओर घटाएँ,
पावों के निचे अंगारे,
सिर पर बरसे यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते  हँसते,
आग लगाकर जलना होगा,
कदम मिला कर चलना होगा’ 

असे हृदयकाव्य लिहणारे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सातार्‍यातही ‘हास्य रूदनमें, तुफाना में’ त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या घरी जावून अटलजींनी त्यांना विनंती करून जनसंघाच्या व्यासपीठावर आणल्याची अद्भूत घटना घडली होती. राष्ट्रीय  व्यक्‍तिमत्व असूनही सत्तरच्या दशकात सातार्‍यात आल्यानंतर अटलजी गादीवर न बसता सतरंजीवर बसल्याचा साधेपणा सातारकरांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सातारा जिल्ह्यातही दु:खाचे उमाळे फुटत आहेत. 

वाजपेयींनीच लिहले होते, 
‘उद्यानों मे, विरानो में, 
अपमानो में, सम्मानों मे,
उन्‍नत मस्तक, उभरा सीना, 
पीडाओं मे पलना होगा,
कदम मिलाकर चलना होगा’

त्यांनी त्यांच्या पद्यपंक्‍तीत सांगितले ते त्यांनी व्यक्‍तिगत आयुष्यातही कृतीत आणले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर कधीही सातारा जिल्ह्यात आले नाहीत. मात्र, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना एकदा कराडात व एकदा वाईत ते येवून गेले तर जनसंघाचे  अध्यक्ष असतानाच ते सातार्‍यातही येवून गेले. परराष्ट्र मंत्री असताना एकदा कराडात व एकदा वाईत  त्यांच्या सभा झाल्या. 

वाई ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री  जोशी यांची कर्मभूमी. तर्कतीर्थांचा कडवटपणा सगळ्या महाराष्ट्राला ठावूक. त्यामुळे तर्कतीर्थांना सहजासहजी मनवणे त्या काळात कुणालाही शक्य नव्हते. तर्कतीर्थ कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जात नसत. तर्कतीर्थांचा हा बाणा अटलजींना माहित होता. अटलजी त्यावेळेस जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. वाईत सभेला आल्यानंतर अटलजी थेट तर्कतीर्थांना भेटायला घरी गेले. अटलजींनी आपल्या शैलीने तर्कतीर्थांना आपलेसे केले. जोशीबुवा, तुम्हाला माझ्याबरोबर व्यासपीठावर यावेच लागेल, हा माझा आग्रह समजा असे म्हणून अटलजींनी विनवणी केली. अटलबिहारी वाजपेयी यांची असलेली प्रतिमा, स्वच्छ व सालंकृत व्यक्‍तीमत्व यामुळे लक्ष्मणशास्त्री जोशीही तयार झाले आणि उभ्या हयातीत कोणत्याही व्यासपीठावर न गेलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अटलजींच्या आग्रहाखातर जनसंघाच्या व्यासपीठावर गेले. वाईत घडलेली ही अद्भूत घटना सार्‍या महाराष्ट्राने त्या काळात पाहिली. अटलजींच्या निधनानंतर वाईत या आठवणीला उजाळा दिला जात आहे. 

1978 साली परराष्ट्र मंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी पुन्हा वाईला आले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस असलेले डॉ. दिलीप येळगावकर यांनी याबाबतची आठवण सांगितली आहे. ते म्हणाले, हरिभाऊ वनारसे तेव्हा वाईचे शहराध्यक्ष होते. पक्षाच्या वाढीसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक लाख रुपयांची थैली अटलजींकडे दिली होती. मात्र, त्यांनी मोठ्या मनाने सातारा जिल्ह्याच्या पक्षवाढीसाठी त्यावेळचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजाभाऊ कुलकर्णी यांच्याकडे ती  थैली सुपूर्द केली. पंढरपूर येथेही धनगर समाजाच्या अधिवेशनाला अटलबिहारी वाजपेयी आले होते. 

1970च्या सुमारास अटलबिहारी वाजपेयी कराडातही आले होते. त्यावेळी टिळक हायस्कूलच्या मैदानावर त्यांनी आवेषपूर्ण भाषण केले होते. ‘भारत को महासत्ता बनाना है तो जनसंघ का  संघटन महत्वपूर्ण है’ असे ते म्हणाले होते. याच कार्यक्रमात 75 हजारांची थैली त्यांना भेट देण्यात आली होती. पत्रकार ते पंतप्रधान असा विस्मयकारक प्रवास केलेल्या अटलजींच्या निधनानंतर कृष्णाकाठ  सुन्‍न आहे. कातरवेळी त्यांनीच लिहलेली कविता रूंजी घालत आहे.

‘क्षणिक जीत में, दीर्घ हार में,
जीवन के शत-शत आकर्षक,
अरमानों को ढलना होगा,
कदम मिलाकर चलना होगा’
परहित अर्पित अपना तन-मन,
जीवन को शत-शत आहुति में,
जलना होगा, गलना होगा,
कदम मिलाकर चलना होगा’ 

जीपगाडीला स्पीकर लावून सायरनचा आवाज काढत वाजपेयींना सातार्‍यात आणले होते व्यापारी बँकेचे माजी चेअरमन गोपाळशेठ यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची हृद्य आठवण सांगितली. ते म्हणाले, भारतरत्न अटलजी जनसंघाचे अध्यक्ष असताना त्यांना सातारला आणताना जीपगाडीला लाऊडस्पिकर लावून त्यावर सायरनचा आवाज काढत आम्ही त्यांना सातारला आणले होते. ती जबाबदारी माझ्यावर होता. ते मला व्यक्‍तीश: ओळखत असत.  याशिवाय राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सीमांचे रक्षण करणार्‍या जवानांच्या सहाय्यांसाठी बँकेच्यावतीने जमवलेला कृतज्ञता निधी आम्ही अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना मुंबई येथे जावून दिला होता. त्यावेळी प्रमोद महाजन यांच्या साक्षीने त्यांनी सातारी कंदी पेढ्याचाही आस्वाद घेतला होता. भारतरत्न आदरणीय अटलजी यांच्या निधनाने एक देवमाणूस आपणा सर्वांना सोडून गेले आहेत. त्यांचे ‘रे भारत माता कोई कागज का तुकडा नही । जिता जागता राष्ट्रपुरुष है ।’ हे वाक्य आणि पुढील भारत मातेचे वर्णन आजही काळजात घुमते. प्रखर राष्ट्रवाद म्हणजे अटलजी, अशा शब्दात गोपाळशेठ यांनी आठवणींना उजाळा दिला. 

‘भगवान के मंदिर पे गद्दी पे नही बैठते’ 

सातारा शहर जनसंघाचे तत्कालिन अध्यक्ष दिनकर शालगर  जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, 20 एप्रिल 1970 साली अटलबिहारी वाजपेयी यांची सातार्‍यात राजवाडा येथील गोलबागेजवळ सभा होती. त्यावेळी भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने  त्यांना 1 लाख रुपयांची थैली देण्यात आली होती. सभेला येताना खणआळी येथे पुनिता वस्त्र भांडार येथे सत्यनारायण महापुजा होती.त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी वाजपेयी यांना  सत्यनारायण पुजेच्या दर्शनासाठी जायचे आहे असे सांगण्यात आले त्यानंतर वाजपेयी दर्शनासाठी तेथे गेले असता त्यांना गादीवर बसण्याची विनंती कार्यकर्त्यांना केली त्यावेळी ‘भगवान के मंदिर मे गद्दी पे नही बैठते’ असे म्हणत ते सतरंजीवर बसले. थोडा वेळ त्यांनी कार्यकर्त्यांशीही चर्चा केली मात्र कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने ते सभास्थानी गेले. त्यावेळी या सभेला प्रतापसिंह महाराजही उपस्थित होते.