Mon, Mar 18, 2019 19:42होमपेज › Satara › पशुधनाला ‘लाळखुरकत’ होण्याचा धोका

पशुधनाला ‘लाळखुरकत’ होण्याचा धोका

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:11PMसातारा : प्रवीण शिंगटे

पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत दरवर्षी पहिल्या टप्प्यात जून व जुलै व दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये जनावरांना नि:शुल्क स्वरूपात दिली जाणारी लाळखुरकत या घातक संसर्गजन्य रोगाची लस वर्षभरापासून सातारा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्धच नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांतील 7  लाख 30 हजार जनावरे लाळखुरकत लसीपासून वंचित राहिली आहेत.

जनावरांना लाळखुरकत रोगाचा (फूट अँड माउथ) प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी गेल्या 8 वर्षांपासून राबवण्यात येत असलेली लसीकरण मोहीम यंदा रखडली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वच्या सर्व 11 तालुक्यांत मोठ्या प्रमाण दुग्धव्यवसाय करण्यात येतो. यावर्षी राज्यस्तरावरूनच लस उपलब्ध नसल्याने पशुवैद्यकीय दवाखन्यातही लस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाळखुरकत या महत्वाच्या लसीअभावी या जनावरांना लाळखुरकतचा धोका निर्माण झाल्याने  पशुपालकांचा जीव टांगणीला लागला आहे. जनावरांना लस देण्यासाठी सुमारे 12 लाख लस येत असते. 

यावर्षी जुलै, ऑगस्टची लसीकरण फेरी केवळ निविदा प्रक्रियेतील घोळामुळे पार पडलीच नाही. शिवाय, लस पुरवठादारांच्या परस्परांमधील हमरीतुमरीमुळे जानेवारी फेब्रुवारीतील मोहीमही रखडली आहे. लसीकरणासाठी फेरनिविदा काढण्याचा घाट शासनस्तरावर सुरू आहे. मात्र, शासनाच्या या घोळात लसमात्रा खरेदी प्रक्रिया लांबत चालली आहे. गेल्या 8 वर्षांपासून  सुरू असलेल्या  या मोहिमेला  खीळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर्षी तरी ही मोहीम यशस्वी होणार की नाही याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जनावरांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे.

असे आहे जिल्ह्यातील पशुधन

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती होते. त्याला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यानुसार जिल्ह्यात जावली - गाय 14153, म्हैस 11603, कराड - गाय 44771, म्हैस 87447, खंडाळा- गाय 22591, म्हैस 8124, खटाव - गाय 35840, म्हैस 43328, कोरेगाव - गाय 38612,  म्हैस 29832, महाबळेश्‍वर - गाय 10391, म्हैस 4115, माण - गाय 53012, म्हैस 36171, पाटण - गाय 33310, म्हैस 54872, फलटण - गाय 68008 ,  म्हैस 19955, सातारा - गाय 30820, म्हैस 39546, वाई - गाय 25754, म्हैस 17851आहेत. गाई, बैल व म्हैस असे सुमारे 7 लाख 30 हजार 106 पशुधन आहे.