Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Satara › वासोटा किल्ल्याला समस्यांचा वेढा

वासोटा किल्ल्याला समस्यांचा वेढा

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:28PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर 

कोयना अभयारण्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कोअर झोनमध्ये समाविष्ट असलेल्या वासोटा किल्ल्याची परवड काही केल्या थांबत  नाही. या किल्ल्याच्या पाठीमागची साडेसाती कायम असून किल्ल्यावरील अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या गेल्या आहेत. किल्ल्याला समस्यांचा वेढा पडला असून पर्यटकांनाही विविध कर भरुनही अडचणींचाच सामना करावा लागत आहे.

वन्यजीव विभागाच्या वतीने अभयारण्य हद्दीत पायवाटा काढणे, जाळ रेषा काढणे, प्राण्यांसाठी पाणवठे बांधणे यासह विविध कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात. त्याचप्रमाणे वासोटा किल्‍ला हा अभयारण्यातच आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना अभयारण्य कार्यालयात जावून परवानगी घेणे सक्‍तीचे असते. परवानगी घेऊन व विविध शुल्क भरावी लागल्यानंतरही  पर्यटकांना अडचणींचा किल्‍ला सर करावा लागतो. विविध शुल्कापोटी अभयारण्याच्या वन्यजीव विभागाला वर्षापोटी लाखो रुपये मिळत असतात.

त्यातून विविध कामे मार्गी लावणेही गरजेचे आहे. यामध्ये वासोटा पायथा, मेटइंदवली - वासोटा किल्‍ला ते नागेश्‍वर मंदिरापर्यंत पायर्‍या बांधणे, किल्ल्यावरील तळ्याची स्वच्छता व बांधकाम करणे, बाबूकडा या ठिकाणी संरक्षक कठडा बांधून त्याला रोलिंग लावणे, वासोट्याच्या पूर्वेकडील बुरुजांचे बांधकाम करणे, नागेश्‍वर मंदिर या ठिकाणी चोरवणे, ता. खेड, जि. रत्नागिरी या बाजूला संरक्षक कठडा बांधून रोलिंग लावणे, अशी विविध कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

वासोटा व नागेश्‍वर मंदिर ही दोन्ही पर्यटनस्थळे उंच डोंगरावर येत असून या ठिकाणाहून कोयना अभयारण्याचे विहंगम दर्शन घडते व कोकण कोठून  सुरु होतो याचा आपणास अंदाज येतो. इतिहासाचे   साक्षीदार व छत्रपती शिवाजी  महाराजांनी  बांधलेल्या वासोटा किल्ल्याचे अस्तित्व टिकवायचे  असल्यास त्याची डागडुजी होणे व त्या ठिकाणाची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वन्यजीवन विभाग कोयना अभयारण्य परिक्षेत्र कार्यालय, बामणोली यांनी पुढाकार घेवून किल्ल्यासह मंदिराची डागडुजी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात लागली आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा

वासोटा किल्ल्यावर आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी इतिहासप्रेमी व पर्यटकांनी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा  सांगणारा हा किल्‍ला असून तो सुस्थितीत ठेवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अन्यथा आगामी काळात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.