Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Satara › प्रीतिसंगमावरून : पुन्हा एकदा आम्ही तिघेच !

प्रीतिसंगमावरून : पुन्हा एकदा आम्ही तिघेच !

Published On: Dec 14 2017 7:10AM | Last Updated: Dec 14 2017 7:10AM

बुकमार्क करा

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते आणि विलासराव पाटील-उंडाळकर या दोन दिग्गजांनी सलग 62 वर्षे केले. 2014 साली  विलासराव पाटील - उंडाळकर यांची सलग या मतदारसंघातून निवडून येण्याची परंपरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंडित केली. तिघा दिग्गज नेतृत्चांचा कराड दक्षिण मतदारसंघ आणि एकाच नेत्याला सलग कौल देण्याची मतदारांची मानसिकता यामुळे हा मतदारसंघ निवडणूक विश्‍लेषणासाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. सलग 19 तास एकाच विषयावर विधीमंडळात चर्चा करणारे स्व. यशवंतराव मोहिते, 50 वर्षे जनमाणसांवर गारुड करणारे विलासराव पाटील-उंडाळकर आणि पारदर्शक कारभारामुळे राज्यभर लोकप्रिय झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण आज दक्ष आहे. 
2014 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर निवडणुका लढविण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतल्यानंतर विलासराव उंडाळकर यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. उंडाळकरांनी बंडखोरी करत अपक्ष तर डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे असणारे वलय,  सुमारे 1200 कोटी रुपयांचा निधी या जोरावर सुमारे 16 हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण निवडून आले. मात्र, अतुल भोसले आणि विलासराव उंडाळकर यांना मिळालेली मते फार मोठी होती. ग्रामीण भागाबरोबरच कराड शहर व मलकापूरने दिलेल्या विक्रमी मतांमुळे पृथ्वीराज बाबा विजयी होऊ शकले. 

2014 साली पृथ्वीराज चव्हाण, विलासराव उंडाळकर आणि अतुल भोसले यांच्या पाठिशी असणारे मतदार संघातील दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील नेते तसेच कराड शहरातील कमी-जास्त प्रमाणात असणारी ताकद यामध्ये गेल्या तीन वर्षांत नोंदणीय असा बदल झाला आहे. दक्षिणमधून पुन्हा एकदा हे तिघेच उभे राहतील अशीच शक्यता आहे.  किंबहुना या मुद्याचाच विचार करून दक्षिणमधील  गणिते मांडणे योग्य ठरेल. 

विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदारसंघातील वैयक्तिक वलय आजही कायम आहे. त्यांनी शहरासहित दक्षिणमधील बहुतांश गावात दिलेल्या विकासनिधीचा वापर होऊन पूर्ण झालेली कामे आता दिसू लागली आहेत. चव्हाण यांच्याकडे थेट पोहोचण्यासाठी येणार्‍या अडचणी त्यांच्यापर्यंत काही निकटवर्तियांनी पोहचवल्यामुळे गेल्या वर्षभरात बाबांनी कार्यपद्धतीत बदल केला आहे. गावागावांतील कार्यकर्त्यांना वन टू वन भेटण्याबरोबरच काही कार्यकर्त्यांना अधूनमधून फोन  होऊ लागले आहेत.  नेहमीच त्यांच्यासोबत असणार्‍या काही मंडळींना बाजूला ठेऊन गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सणासुदीच्या काळात त्यांनी केलेले संपर्कदौरे त्यांच्या पथ्यावर पडले. या सर्व गोष्टींचा फायदा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींत त्यांना मिळाला. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व मिळवले. 

विलासराव पाटील उंडाळकर यांनी पराभवातून धडा घेत लगेच त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने प्रत्येक दिवशी किमान एक गाव संपर्क अभियान सुरुच ठेवले. आमदारकी नसताना सुरूवातीला ‘दुर की सोच’ म्हणून फक्त गरज ओळखून त्यांच्या विरोधात लढलेल्या डॉ. अतुल भोसले गटाला जवळ केले. तालुक्यातील इतर सर्व दिग्गज विरोधात असताना बाजार समिती पृथ्वीराज चव्हाण आणि आ. बाळासाहेब पाटील गटाकडून हिसकावून घेतली. त्या बदल्यात भोसले गटाला सहकार्य करून कृष्णा कारखान्यावरही सत्तांतर घडवून आणले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांइतकेच यश मिळवत आ. बाळासाहेब पाटील यांच्याशी सलगी करून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यानंतर राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साधत कार्यकर्त्यांना चार्ज करत नुकताच भव्य असा कार्यक्रम घेतला. दिग्गज काँगे्रस नेत्यांबरोबरच वैचारिक व्यासपीठावरून ‘मी थकलेलो नाही, अजूनही रेसमध्ये आहे’, असा इशारा विरोधकांना दिला. 

डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेतील निसटत्या पराभवानंतर घरातील भांडणे मिटवून घेत मदनराव मोहिते यांच्यासह जुळवून घेतले. कृष्णा कारखाना आणि बाजार समितीच्या निवडणुकीत उंडाळकर गटाची केलेली युती तोडून टाकत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच भवितव्य आजमावण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले, गटही मजबूत झाला.  तत्पूर्वी कराड नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून त्यांच्या विचाराच्या रोहिणी शिंदे निवडून आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवत अतुलबाबांनी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून चार गावांमध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनांसाठी कोट्यावधींचा निधी आणला. केवळ तिकिट मिळाले म्हणून भाजपातून उभे राहिलेले अतुल भोसले भाजपाची कार्यप्रणाली स्विकारतील काय? अशी शंका भाजपासहीत इतर सर्व पक्षातील लोकांना होती. मात्र मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास संपादन करत त्यांना तीन वेळा कराडला आणून मी भाजपमय झालो आहे, असा संदेश देत त्यांनी दक्षिणमध्ये भाजपाचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न केला. या निष्ठेचे फळ म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान कमिटीचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. कृष्णा साखर कारखाना तसेच जयवंत शुगर्समध्ये शेतकर्‍यांशी संपर्क ठेवण्याबरोबरच विक्रमी ऊस दर यामुळे डॉ. भोसले यांनी दक्षिणमध्ये मीच सक्षम आहे, असा दावा केला आहे. 

2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी संभाव्य दिग्गज तीन उमेदवारांची ही झाली जमेची बाजू. मात्र दुसर्‍या बाजूने विचार केला तर  या तिघांनीही स्वत:ला ठराविक प्रतिमेत आणि ठराविक भागापुरते मर्यादित ठेवले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कराड शहर व परिसराशी असतो. विलासराव उंडाळकर काले, ओंड, उंडाळे, कोळे भागातच अधिक सक्रिय असतात. अतुल भोसले यांना कृष्णाकाठ आणि कधीतरी कराड शहर या व्यतिरिक्त दुसरीकडे संपर्क ठेवायला जमत नाही. निवडणुकीपूर्वी काही महिने हे तिन्ही नेते मतदारसंघात खूप सक्रिय असतात. स्वत:चे बालेकिल्ले किंवा  दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांचे नेटवर्क याबाबत तिघांनाही मर्यादा आहेत. उंडाळकरांना शहरात तितक्या दमाचा कार्यकर्ता न मिळाल्यामुळे ते अजूनही चाचपडत आहेत. कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि काँग्रेस पक्ष सक्षम करण्यात आ. पृथ्वीराज चव्हाण  फार मागे आहेत. डॉ. अतुल भोसले यांना  कृष्णा काठावरील नेहमीच्याच जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय नवीन दमदार कार्यकर्ते मिळालेले नाहीत. हे तिन्ही संभाव्य उमेदवार आजच्या घडीला संपूर्ण दक्षिण मतदारसंघात सक्षमपणे यंत्रणा राबवत नाहीत, असे म्हणावे लागेल. निवडणूक काळापर्यंत बर्‍याच गोष्टी घडणार आहेत. पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे सद्य स्थितीत वेगवेगळ्या माध्यमातून हे तिघेही संभाव्य उमेदवार ‘आम्ही आहोतच’ या दिशेने कामाला लागलेले दिसत आहेत. राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, असा कराड दक्षिणचा आजवरचा लहरी राजकीय इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते, कराडचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव हे ही निर्णायक भूमिका बजाऊ शकतात. याशिवाय मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आणि मदनराव मोहिते हे अतुल भोसले यांच्यासाठी हुकूमाचा एक्का ठरू शकतात की नाही याचे उत्तर 2019 लाच मिळणार आहे. 

- सतीश मोरे

 

वाचा : प्रितिसंगमावरुन : दखलनीय काका काँग्रेस