होमपेज › Satara › घाटमाथ्यावरील नियंत्रणासाठी वसंतगड

घाटमाथ्यावरील नियंत्रणासाठी वसंतगड

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:01PMकराड : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य आणि तळबीड यांचे परस्परांशी असलेले नाते अगदी घट्ट होते. तळबीडने हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या ताराबाई यांच्यासारखी रत्ने स्वराज्याला दिली. तसेच वसंतगडचा वापर घाटमाथ्यावर नियत्रंण ठेवण्यासाठी केला जात होता.

स्वराज्य मावळ, इंदापूर, पुणे  प्रांतात विखुरले होते. कराडजवळील प्रदेश स्वराज्यात नव्हता. मात्र अफझलखान वधानंतर पन्हाळ्याकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तळबीडजवळील वसंतगड किल्ला सर केला. या किल्ल्यापासूनचा घटमाथ्यापर्यंतचा परिसर सपाटीचा होता. त्यामुळेच वसंतगडचा वापर घाटमाथ्यावर नियत्रंण ठेवण्यासाठी, प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि लढाईच्या काळात संरक्षण स्थिती मजबूत करण्यासाठी केला जात होता.  वसंतगड किल्ला भोज शिलाहार राजाने बांधला होता. 1659 मध्ये वसंतगड स्वराज्यात आला. शिवाजी महाराज यांचा कठोर न्याय या किल्ल्याने अनुभवला आहे. तसेच छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून परतत असताना काहीकाळ वसंतगडावर मुक्कामीही थांबले होते.

समर्थांच्या उपासनेमुळे मिळाली रत्ने समर्थ रामदास स्वामी यांनी कोल्हापूर, सांगली, सातार्‍यात जिल्ह्यात 11 मारूतींची स्थापना करत युवकांना शक्तीची उपासना दिली. त्यामुळेच स्वराज्याला तळबीडच्या हंबीरराव मोहिते यांच्यासारखा सरसेनापती, उंब्रजच्या धनाजी जाधव, औंध परिसरातून प्रतापराव गुजर यांच्यासारखे अनेक लढवय्ये मावळे मिळाले.

तळबीडमधून स्वराज्याला मिळाली रत्ने

नेसरीच्या लढाईत तत्कालीन सरसेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी मावळ्यांना सोबत घेत शत्रू सैन्याचा पराभव केला. त्यानंतर स्वकर्तुत्वाने, पराक्रमाने हंबीरराव मोहिते यांच्याकडे सरसेनापतीपद आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसर्‍या पत्नी सोयराबाई तळबीडच्या. याशिवाय राजाराम महाराज यांच्या पत्नी रणरागिणी महाराणी ताराबाई यासुद्धा तळबीडच्याच. सोयराबाई हंबीरराव मोहिते यांची बहिण तर महाराणी ताराबाई या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर कठीण प्रसंगातही ताराबाई यांनी मोघलांच्या कर्दनकाळ बनल्या होत्या. संताजी, धनाजी यांचे नेतृत्व निर्माण करण्यात महाराणी ताराबाई यांचा मोलाचा वाटा होता.