Thu, Mar 21, 2019 11:26होमपेज › Satara › उरमोडीचे पाणी बारामतीला नेण्याचा पवारांचा डाव : दिवाकर रावते 

उरमोडीचे पाणी बारामतीला नेण्याचा पवारांचा डाव : दिवाकर रावते 

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

माण - खटावला वरदायिनी ठरणार्‍या उरमोडीचे पाणी बारामतीला पळवण्याचा घाट खा. शरद पवार यांनी घातला असून त्यांना फलटणचे राजे सहकार्य करत आहेत. माण-खटावला जरी पाणी मिळाले नाही तरी त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही. स्वत:ची पोळी भाजली की झालं, अशी परंपराच बारामतीकरांची आहे, असा टोला राज्याचे परिवहनमंत्री व संपर्क नेते ना. दिवाकर रावते यांनी लगावला.हॉटेल लेक व्ह्यू येथे आयोजित केलेल्या सातारा  जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, हर्षल कदम, युवासेना प्रमुख रणजितसिंह भोसले, महिला संघटक शारदा जाधव उपस्थित होते.

ना. दिवाकर रावते म्हणाले, शिवसैनिकांनो तुमचे अस्तित्व काय आहे? तुम्ही किती काम करता? हे पाहण्याची माझी पध्दत आहे. बाळासाहेब देसाईंसारखा वारसा आपल्या शिवसेनेला मिळतो. हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. बाळासाहेब देसाई मंत्री म्हणून काम करत असताना शिवतीर्थावरील पुतळा त्यांच्या स्मारक समितीच्या माध्यमातून उभारण्यात आला. एक रूबाबदार व्यक्‍तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील पहिला सिमेंटचा रस्ता पाटण तालुक्यात  बाळासाहेब देसाई यांनी केला. 

शिवसैनिक गेल्या निवडणुकीत लढले पण अपयश आले. ते अपयश कसे आले ते आत्मचिंतन करा. नव्या पिढीला वाव देवून पुढे न्यायचे काम करा. महिला आघाडीत वाढ होत आहे.त्यांना आरक्षण मिळाले आहे म्हणून शिवभगिनींना साथ द्या. शिवशक्तीचा बाण खूप मोठा आहे. विजयाच्या मार्गाकडे जाण्याची सकारात्मक क्षमता त्यांच्याकडे आहे.

शिवसैनिकांमध्ये 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण असले पाहिजे. सध्याचा पदाधिकारी गटातटात प्रतिष्ठेखाली अडकला आहे. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यात बुथ प्रमुखांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांना पूर्ण अधिकार दिले आहेेत. शिवसेना पदाधिकार्‍यांना प्रत्येक गावात कोणत्या समस्या आहेत. कर्जबाजारी कोण आहे, सावकारी कोण करतंय, त्यात कोण अडकलंय का? या समस्या जाणून घेऊन सोडवल्या पाहिजेत. त्याचा आराखडा तयार करून संघर्ष केला पाहिजे त्यातून फुल ना फुलाची पाकळी मिळेल त्यालाच शिवसैनिक म्हणता येईल, असे ना. रावते म्हणाले.

पैशाविना लढणारा एकमेव पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे.बिना पैशाचा उमेदवार निवडून आणण्याचे सामर्थ्य शिवसेनेत आहे.पक्ष निष्ठावंत आहे, तुम्हीही निष्ठेने काम करा. पदाधिकार्‍यांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे. तळमळीने काम केल्यास समाजापर्यंत नक्कीच शिवसेना पोहोचेल. सातार्‍यात राष्ट्रवादी, सांगलीत भाजपा, कोल्हापुरात शिवसेना असे पक्ष आहेत.

विधानसभेला शिवसेनेचा एक आमदार असून 2019  च्या निवडणुकांमध्ये पाच आमदार करण्याची क्षमता निर्माण करा. आपण आता सत्तेत नसून फक्त टेकू देण्याचे काम केले आहे. मला जिंकायचे आहे, कोण पडला, का पडला त्याचे काय देणे घेणे नाही. फक्त आपल्याला जिकायंचे आहे, हा निर्धार मनात ठेवा. सातारा जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी  एक वज्रमुठ तयार करा, अशा सूचनाही ना. रावते यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या.

अरूण दुधवाडकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घर तेथे शिवसैनिक निर्माण केला आहे. त्यांचाच वारसा आपण पुढे चालू ठेवून घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शाखा उघडल्या पाहिजेत. यावेळी  चंद्रकांत जाधव, हर्षल कदम, शारदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला जिल्ह्यातून शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.