Fri, May 29, 2020 17:51होमपेज › Satara › ‘पोस्टर बॉइज’मुळे निष्पापांचा जीव धोक्यात

‘पोस्टर बॉइज’मुळे निष्पापांचा जीव धोक्यात

Published On: Oct 08 2018 1:09AM | Last Updated: Oct 07 2018 9:09PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

शहरी विभागातील बॅनर, होर्डिग्जंच फ्याड गेल्या काही वर्षांत ग्रामीण विभागातही मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. किंमतीत स्वस्त आणि प्रसिद्धीला मस्त अशामुळे याचा सर्रास वापर होत आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा संबंधित जागामालक, पोलिस यंत्रणा यांच्या परवानगीशिवाय हा उद्योग सुरू असल्याने मग याचा स्थानिक कर आकारणीला तर फटका बसतो. अशा पोस्टरबॉइज तथाकथित व स्वयंघोषित नेते कार्यकर्त्यांच्या फाजील लागुंलचलनात सामान्यांचे हाल व बळी जात असल्याचे चित्र पहायला मिळते.

अशा होर्डिग्जं व बॅनरमुळे सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आली आहे. व्यावसायिकांची भलीमोठी होर्डिग्ज तर वाढदिवसाच्या निमित्ताने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व गल्लीबोळातील फळकूट दादांच्या कमालीच्या जीवघेण्या बॅनरमुळे सामान्य माणूस वैतागला आहे. 

अशा बेफाम बॅनरबाजीला कंटाळून काही मंडळींनी थेट गाढवं, कुत्र्यांच्या वाढदिवसांचे बॅनर लावले. त्यात ते प्राणी लाजले परंतू या पोस्टरबॉइज मंडळीना यात कसलीच लाज वाटली नाही ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक यात स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस व महसूल यंत्रणा यांचा दंडात्मक बडगा महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी असो किंवा अगदी पोलिस दलात, ते अगदी पोलिस पाटील म्हणून नेमणूक झाली की लगेचच रस्त्यावर याच मंडळीचे बॅनर लागतात. 

त्यामुळे अशा  बॅनर लावणार्‍या अपप्रवृत्तींमुळे सामाजिक व्यवस्था लोप पावत आहे. पुण्यातील होर्डिग्जंमुळे चार निष्पांपाचा नाहक बळी गेला अनेक जखमी झाले तर पाटण तालुक्यातील आडूळ गावात याच  बॅनर संस्कृतीचा निष्पाप बळी व काहींना कायमचे शारिरीक निकामी होण्याचे दुर्भाग्य नशिबाला आले. त्यामुळे जीवघेण्या या होर्डिग्जं व बॅनरला आवर घालण्यासाठी यापुढे पोलिसांबरोबर संबंधित विभागाकडून ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. 

किमतीत स्वस्त आणि प्रसिध्दीला मस्त...

ज्यांच्या हाती कारवाईचे अधिकार तेच अशा वाढदिवसांचे पाहुणे असल्याने मग न्याय कोणाकडे मागायचा असा गंभीर प्रश्‍न. पुर्वी मर्यादीत, ज्यादा खर्चाची बॅनर परवडणारी नसायची. मात्र, आता कमीत कमी खर्चात भलीमोठी बॅनर मिळत असल्याने मग गल्लीबोळातील अगदी चिरीमिरी भुरट्या चोर्‍या करून पोलिस कोठडीतून सातत्याने आत बाहेर करेणार्‍या मंडळींचे बॅनरही चौकाचौकात पहायला मिळतात. 

वाढदिवस भावाचा, जल्लोष आख्या गावाचा...

नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर तर नेत्याचा फोटो लहान मात्र शुभेच्छुकाचा भलामोठा फोटो असतो. कित्येकदा तर त्या बॅनरवर रेकॉर्ड ब्रेक अशी शुभेच्छुक कार्यकर्त्यांची पिलावळ पहायला मिळते. काहींच्या बॅनरवर तर वाढदिवस भावाचा, जल्लोष आख्या गावाचा. अशी स्तुतीसुमने वाचायला मिळतात. तर त्या बॅनरवरील फोटोंचा रंग उडून काहीच दिसत नसले तरी तो बॅनर जागेवरून हालत नाही. आणि मग वादळ, वारा, पाऊस यात तो कोणाच्या तरी अपघाताचे कारणही बनतो.

‘शो’बाजी बेतते जीवावर

मारूल हवेली : धनंजय जगताप

फलक लावण्याचे पेव शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पसरले असून फलक लावताना किंवा लावल्यानंतर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. जाहिरातींसाठी केलेल्या फलकांची शो बाजी अनेकांच्या जीवावर बेतत आहे.

अडुळपेठ (ता.पाटण) येथे फलक लावणार्‍या पाच युवकांना कारने धडक दिल्याची घटना ताजी आहे. पुणे येथेही होर्डींग ढासळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. अशा घटनांनी फलकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गावागावातील चौकाचौकात, मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी, बस स्टँड परिसरात, रस्त्याच्या कडेला लावण्यात येणार्‍या फलकामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर फलक लावताना घडलेल्या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहींना शरीराचा अवयवही गमवावा लागला आहे.

वाढदिवसानिमित्त, लग्नकार्य, इतर कार्यक्रमांचे फलक व जाहिरातींचे फलक लावण्याची प्रथाच जणू सर्वत्र पडली आहे. हे फलक गावच्या वेशीवरील कमानीवर, उंच इमारतीवर, धोकादायक जागेत, विद्युत खांबावर तसेच सहजासहजी नागरिकांच्या नजरेत येईल अशा मोक्याच्या जागेवर लावण्यात येतात. फलक लावताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. दुसरीकडे फलक लावल्यामुळे शहराचे व गावचे विद्रुपीकरण वाढत आहे. वाहतुकीला अडथळा ठरत असतात. याचा विचार मात्र फलक लावणारे करीत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा धोका निर्माण होऊन तो जिवावर बेतू शकतो. 

फलक लावण्याची असते स्पर्धा

नेत्यांचे किंवा गावातील कथीत पुढार्‍यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनर लावणे म्हणजे एक महान कार्य आहे, असे समजले जाते. याची क्रेझ युवावर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असून अनेक ठिकाणी भले मोठे फलक लावले जातात. कोणाचा फलक किती मोठा लावला जातो, याबाबत कार्यकर्ते, हितचिंतक किंवा विरोधकांमध्ये अघोषित स्पर्धा सुरू असते. त्यामुळे अनेक ठिकाणी रूंद, उंच, मोठे फलक लावण्यात येतात. अशा पद्धतीने फलक लावल्यामुळे तसेच जागेवरून काही वेळेला वादावादीचे प्रकार घडत असतात. त्यातून पुढे मोठ्या हाणामारीच्या घटना घडतात. केवळ ‘शो’बाजीसाठी फलकांचे पेव फुटले असून त्यातून समाजहिताचे काय ? याचा विचार करण्याची गरज  आहे.