Mon, Aug 19, 2019 06:58होमपेज › Satara › नेत्यांच्या मानासाठी लाखो रुपयांचा खर्च

नेत्यांच्या मानासाठी लाखो रुपयांचा खर्च

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:18PMऔंध : वार्ताहर

ग्रामीण भागात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पै, पाहुणे, नेतेमंडळी, आप्ततस्वकीयांचा मान, सन्मान, सत्कार, सोहळे आयोजित  करण्यासाठी लाखो रूपयांचा चुराडा केला जातो. सध्या सोशलमीडियाची धुम असल्याने या माध्यमातून लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमात केला जाणारा हा वायफळ खर्च थांबवून तो गावच्या सामाजिक कार्यासाठी, पाणी बचत योजना, वृक्षलागवड आदी कार्यक्रमांवर खर्च करावा, अशी चर्चा सोशल मिडीयावर होऊ लागल्याने वेगवेगळ्या सोशल साईटसवर, या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग बनले आहे. या धावपळीच्या जगातही लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रम म्हटले की घरोघरी मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची  परंपरा आहे. यामध्ये येणार्‍या पाहुणे मंडळींचा, नेतेमंडळींचा मानसन्मान  करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो.  त्यामध्ये हारतुरे, बुके, शाल श्रीफळ, फेटे, टॉवेल, टोपी तसेच महिलांना साडीचोळी व अन्य प्रकारच्या भेटवस्तू वधूवर पक्षाकडून दिल्या जातात.  यासाठी अनेक ठिकाणी लाखो रुपये विनाकारण खर्च केले जातात. भेट, स्वागत किंवा आहेराची वस्तू भेट देण्यासाठी वापरली जाते. त्यांचा अन्य कामांसाठी उपयोग होत नाही. त्यातच आज अनेक गावे वाडयावस्त्यांवरील नागरिक, रहिवाशांची मानसिकता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीसारखे असणारे वादविवादही गावोगावी निकाली निघाले आहेत.

सध्या पाणीटंचाई हा दुष्काळी भागातील रहिवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे वॉटरकप स्पर्धा व अन्य मार्गाने  या समस्येवर मात करण्यासाठी गावेच्या गावे एकजूट झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी होणार्‍या लग्नसमारंभातील खर्चाला फाटा देऊन हा सर्व अनावश्यक पैसा अशा सामाजिक कामासाठी खर्च करावा. त्यामुळे विविध प्रकारचे बंधारे, जलसाठे निर्माण करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवड, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी, रुग्णांसाठी हा पैसा दिल्यास सत्कारणी लागेल, अशा चर्चाही सोशल मीडियामध्ये होवू लागल्याने सोशलमिडीया हे समाज परिवर्तनाचे माध्यम बनले आहे.त्याचे सकारात्मक परिणामही जाणवू लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी काही प्रमाणात याची अंमलबजावणी होऊ लागली आहे. पण, त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.