Sat, Jul 20, 2019 21:24होमपेज › Satara › बँकेच्या काऊंटरवरून ५० हजार लांबवले 

बँकेच्या काऊंटरवरून ५० हजार लांबवले 

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 10:59PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर स्लीपमध्ये खाते नंबर टाकत असताना अज्ञाताने काऊंटरवर ठेवलेली 49 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, भरदिवसा बँकेत घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

महेंद्र रामकृष्ण निकम (वय 34, रा. मि. अपशिंगे) यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महेंद्र निकम हे सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता एचडीएफसी बँकेत 1 लाख रुपयांची रक्‍कम भरण्यासाठी गेले होेते. बँकेत गेल्यानंतर दोन स्लिप घेवून त्यांनी त्या भरल्या. कॅश काऊंटरवर आल्यानंतर हातातील पैशांचे दोन बंडल त्यांनी ठेवले. यावेळी एका स्लिपमध्ये खाते क्रमांक टाकायचे राहिले असल्याचे निकम यांच्या लक्षात आले.

तक्रारदार महेंद्र निकम हे दुसर्‍या स्लिपमध्ये खाते क्रमांक टाकत असताना अज्ञात चोरटा पाठीमागून आला व त्याने दोन रोखीच्या बंडलपैकी एक बंडल उचलला व तेथून निघून गेला. हा प्रकार लक्षात येताच महेंद्र निकम यांनी आरडाओरडा करत त्या संशयिताचा पाठलाग केला. तोपर्यंत संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला. निकम यांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला व बँक प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्यानंतर तत्काळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सीसीटीव्हीची पाहणी करुन तपासासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, भरदिवसा बँकेत घडलेल्या या घटनेमुळे बँक सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.